राज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा

Published On: Jun 20 2019 7:54PM | Last Updated: Jun 20 2019 7:54PM
Responsive image


रत्नागिरी : प्रतिनिधी

शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. शाळांचे पसंतीक्रम व यादी डाऊनलोड करण्यासाठी गुरूवारपासून संधी देण्यात आली. परंतु, पवित्र पोर्टलचा सर्व्हर डाऊन झाल्याने व विविध तांत्रिक कारणांमुळे राज्यभरात या प्रक्रियेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे डीएड्, बीएड् धारकांमधून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील दीड वर्षांपासून पवित्र पोर्टलद्वारे राज्यभरात शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र वारंवार ही भरती प्रक्रिया वादात सापडत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून सुरू असणाऱ्या या प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत. विषेश म्हणजे या समस्या सोडवण्यासाठी शिक्षण विभागाने नेमलेली यंत्रणाही उमेदवारांना दाद देत नाही. समस्या सोडवण्यासाठी कोणी वालीच नसल्याने शिक्षक भरतीचा गोंधळ आणखीन वाढू लागला आहे. या समस्या कधी दूर होणार आणि शिक्षक भरती कधी होणार? असा संतप्‍त सवाल डीएड्, बीएड् धारकांमधून केला जात आहे.

राज्यभरातील उमेदवारांना पसंतीक्रम डाऊनलोड करण्यासाठी अडथळे येत होते तर काही उमेदवारांना चुकीच्या शाळा दाखवण्यात येत होत्या. त्यात सुधारणा करून या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार गुरूवारपासून ठराविक उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार शाळा निवडीसाठी यादी डाऊनलोड करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या.

सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून उमेदवारांची विभागणी पोर्टलवर करण्यात आली आहे. परंतु पहिल्याच दिवशी गुरुवारी शाळांची यादी दिवसभर डाऊनलोड झाली नाही. सर्व्हरला वारंवार तांत्रिक अडथळे येत असल्याने हजारो उमेदवारांना सायबर कॅफेमध्ये ताटकळत थांबावे लागले. यातून पर्याय काय काढावा यासाठी अनेकांनी पुण्यातील कार्यालयाला कॉलदेखील केले. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत शाळांची यादी डाऊनलोड न झाल्याने हजारो उमेदवारांमधून संताप व्यक्‍त करण्यात आला. अनेकांना तर एखाद दुसरी शाळा दाखवत होती. जिल्ह्यात जागा असूनही नंदुरबार, धुळे येथील शाळा काहींना दिसत होत्या. अनेकांना तर शाळाच दिसल्या नाहीत.

मागील दीड वर्षांपासून पोर्टलचा हा खेळ डीएड्, बीएड् धारकांच्या जीवनाशी खेळला जात आहे. त्यामुळे शासनाला नक्‍की भरती करायची आहे का? असा संतप्‍त सवाल केला जात आहे. शाळांची यादी डाऊनलोड करण्याच्या पहिल्याच दिवशी पवित्र पोर्टलचा बोजवारा उडाल्याने यापुढील प्रक्रियेचा विचारच न केलेला बरा. अजूनही 75 टक्के प्रक्रिया शिल्‍लक आहे. भरतीच्या सुरूवातीच्या टप्प्यात इतका गोंधळ उडत असेल तर मुख्य प्रक्रियेवेळी होणारा गोंधळ राज्य शासन कसा दूर करणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

गुरूवारी रात्री उशिरापर्यंत अनेकांच्या याद्या डाऊनलोड झाल्या नव्हत्या. प्रत्येक उमेदवाराला एका दिवसाचाच अवधी देण्यात आला आहे. गुरूवारी ज्यांच्या याद्या डाऊनलोड झाल्या नाहीत त्यांना मुदत वाढवून देणार का? याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.