Mon, Jun 17, 2019 18:45होमपेज › Konkan › विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणार्‍या शिक्षकाला बडतर्फ करा!

विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणार्‍या शिक्षकाला बडतर्फ करा!

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 10:12PMवैभववाडी : प्रतिनिधी 

अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणार्‍या ‘त्या’ शिक्षकाची सखोल चौकशी करुन त्याला बडतर्फ करावे, अशी मागणी पं.स.सदस्य मंगेश लोके यांनी केली.  त्याच्यावर केवळ निलंबनाची कारवाई करुन चालणार नाही. दोन वषार्ंपूर्वी ग्रा.पं.ने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी झाली असती, तर ही वेळ आली नसती  अशी नाराजी त्यांनी व्यक्‍त केली.

वैभववाडी  पं. स. ची मासिक सभा सभापती लक्ष्मण रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला उपसभापती हर्षदा हरयाण, सदस्य अरविंद रावराणे, अक्षता डाफळे, दुर्वा खानविलकर, मंगेश लोके, गटविकास अधिकारी श्रीराम शिरसाट, सा. गटविकास अधिकारी शशिकांत भरसट, जिल्हा कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची जी कामे रखडली आहेत  ती  कोणत्याही परिस्थितीत मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावीत.  एप्रिल, मे महिन्यात पाणी टंचाईची बोंब होता नये, अशी सक्‍त सूचना सभापती रावराणे यांनी पाणीपुरवठा अधिकार्‍यांना केली.  याबाबत सभापती, गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा करावी, केवळ मिटिंग घेऊन हा प्रश्‍न सुटणार नाही ,अशी सूचना अरविंद रावराणे यांनी केली.  

तालुक्यातील 65 शाळा डिजिटल झाल्याचे सांगितले जात आहे.  मात्र प्रत्यक्षात किती शाळा डिजिटल झाल्या याचा सर्व्हे करा. आ. नीतेश राणे यांनी 25 शाळा डिजिटल केल्या. त्यावेळी आणखी शाळा दिल्या असत्या तर डिजिटल झाल्या असत्या, असे अरविंद रावराणे यांनी सांगितले.

तालुक्यातील रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची राजरोसपणे कत्तल केली जात आहे. मात्र, याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. कोणी तक्रार केली तर एकमेकांकडे बोट दाखवून शासकीय विभाग आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप मंगेश लोके यांनी केला. याला अरविंद रावराणे यांनी दुजोरा दिला. त्यांची मालकी शासनाची नसेल तर किमान त्या जमीन मालकाला तरी त्या झाडांचा लाभ घेऊ दे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली चांगली झाडे तोडली जात आहे.  

तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत आहे . ही तोड थांबली पाहिजे, अशी मागणी रावराणे यांनी केली.पंचायत समिती सदस्यांना विकासकामांसाठी शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, असा ठराव आजच्या सभेत अरविंद रावराणे यांनी मांडला.  याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शवत हा ठराव शासनास पाठविण्यात यावा, असे सूचित केले.