Sat, Jul 20, 2019 21:50होमपेज › Konkan › गुरुजी होणे...नको रे बाबा!

गुरुजी होणे...नको रे बाबा!

Published On: Jul 02 2018 1:44AM | Last Updated: Jul 02 2018 12:57AMरत्नागिरी : विशाल मोरे

शिक्षक भरतीवर शासनाने घातलेले निर्बंध, काठिण्य पातळीवरील टीईटी परीक्षा,  नोकरीची नसलेली शाश्‍वती यामुळे गुरुजी होण्याकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. यामुळे प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.) अभ्यासक्रमाला ग्रहण लागले आहे. यंदा या अभ्यासक्रमाला 370 जागांसाठी केवळ 67 जणांनी ऑनलाईन प्रवेश नोंदणी केली आहे.

डी. एड. (आताचे डी. एल. एड.) म्हणजे शिक्षक होण्याची नामी संधी असे समीकरणच गत 10 वर्षांपूर्वी रूढ झाले होते. डी.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक जण या काळात शिक्षक झाले. यामुळे डी.एड.ची लोकप्रियता वाढली. राज्यात डी.एड. महाविद्यालयांचे अक्षरशः पेव फुटले. 80 ते 85 टक्क्यांची मेरिट लिस्ट लागू लागली. यामुळे या अभ्यासक्रमाकडे ओढा असलेले विद्यार्थी भरमसाट फी भरून विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ लागले. याचा परिणाम मात्र उलटा झाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी डी. एड्.चा अभ्यासक्रम पूर्ण करुन बाहेर पडू लागले. त्या प्रमाणात शिक्षक भरती मात्र कमी प्रमाणात होऊ लागली. सन् 2010 मध्ये शासनाने शिक्षकांच्या भरतीवरच बंदी घातली. आणि अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची शिक्षक अशी ओळख होण्याऐवजी सुशिक्षित बेरोजगार अशी ओळख बनली. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाशी फारकत घेतली आहे.

जिल्ह्यात 6 अध्यापक महाविद्यालय असून, यातील मंडणगड आणि गुहागर तालुक्यातील आबलोली येथील दोन महाविद्यालये विद्यार्थी नसल्याने बंदच आहेत. राजापूर आणि रत्नागिरीत अनुदानित महाविद्यालये असून, येथेही प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. सावर्डे आणि भरणे येथील विनाअनुदानित महाविद्यालयातही विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पाठ फिरवली आहे. 
शिक्षकांच्या भरतीवर शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे विद्यार्थ्यांना डी.एड्. करुन नोकरी मिळेलच याची खात्री वाटत नाही. यामुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवायला सुरूवात केली आहे, ही वस्तुस्थिती आहे. हे नाकारता येणार नाही. शासनाने शिक्षकांच्या भरतीवरील बंदी उठवली तर मात्र चित्र वेगळे दिसेल. विद्यार्थ्यांअभावी डी.एड्. महाविद्यालयांना टाळे लावण्याची वेळ संस्थाचालकांच्यावर आल्याने या महाविद्यालयांमध्ये अद्यापनाचे काम करणाऱया शिक्षकांच्या नोकर्‍यांवरही गंडातर आले आहे. अनेक शिक्षक विद्यार्थ्यांच्याप्रमाणेच सुशिक्षीत बेरोजगार झाले आहेत. काही ठिकाणी प्राध्यापक अतिरिक्त झाले आहेत. त्यांच्या समायोजनाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

अल्प प्रतिसादामुळे प्रवेशासाठी मुदतवाढ 
विद्या प्राधिकरण, पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी प्राथमिक शिक्षण पदविका अभयासक्रम डी.एल.एड.प्रथम वर्ष ऑनलाईन (शासकीय कोटा) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 30 जून 2018 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अपेक्षित प्रवेश न आल्याने ही मुदत 5 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.