होमपेज › Konkan › शिक्षकांच्या माहितीची ‘मास्टर फाईल’ करणार

शिक्षकांच्या माहितीची ‘मास्टर फाईल’ करणार

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:10PMरत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची अद्ययावत माहितीची पंचायत समिती स्तरावर मास्टर फाईल तयार करण्यात येणार असून त्यामुळे पुन्हा पुन्हा वेगवेगळी प्रमाणपत्रे देण्याचा त्रास शिक्षकांना होणार नाही, अशी माहिती रत्नागिरी पंचायत समितीचे प्र. गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा रत्नागिरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती रत्नागिरी यांची भेट घेऊन चर्चा केली. गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न तत्परतेने सोडविण्याबाबत तत्पर असून प्रश्‍नांबाबत सुरु असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.
चटोपाध्याय आणि निवड श्रेणी वेतनश्रेणीची फरकाची बिले तयार होऊन काम अंतिम टप्प्यात असून या महिन्याच्या शेवटी बिले खर्ची पडतील, असे यावेळी गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले.ज्या शिक्षकांचे चटोपाध्याय आणि निवडश्रेणी वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत, अशा शिक्षकांचे प्रस्ताव पुन्हा मागवून तालुक्यातील एकही शिक्षक वेतनश्रेणीपासून वंचित राहणार नाही, असे आश्‍वासन दिले.

सेवापुस्तकातील नोंदी अद्ययावत करण्यासाठी 15 एप्रिलपासून केंद्रस्तरावर शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. पोषण आहार देताना खुल्या बाजारातून खरेदी केलेल्या जिन्नसाची बिले येत्या 2 दिवसांत खर्ची पडणार असून जानेवारी 2018 पर्यंतचे इंधन भाजीपाला अनुदान खात्यावर जमा झाले आहे. महाराष्ट्र दर्शन बिलांचे नवीन प्रस्ताव तयार करून त्वरित मंजूर करून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.           याचसोबत कामगिरी शिक्षकांचा प्रश्‍न, सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया येत्या आठ दिवसांत पूर्ण करून घेणार, दीर्घ मुदत रजा आदी प्रश्‍नांवर यशस्वीपणे चर्चा करण्यात आली.  याप्रसंगी तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, सरचिटणीस अमित दुधाळे, कार्याध्यक्ष  महेश कामेरकर, कोषाध्यक्ष समीर कारेकर, प्रवक्ते पंकज जोशी, जिल्हा नेते प्रभाकर खानविलकर, जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर दळवी, महिला उपाध्यक्ष सौ. कविता खेडेकर, जिल्हा महिला उपाध्यक्ष सौ.सोनाली कडवईकर आदी उपस्थित होते.