Sun, Dec 08, 2019 19:59होमपेज › Konkan › ... अन् विद्यार्थी थोडक्यात वाचला!

... अन् विद्यार्थी थोडक्यात वाचला!

Published On: Jul 19 2019 2:16AM | Last Updated: Jul 18 2019 8:56PM
रत्नागिरी : प्रतिनिधी

पाऊस आणि सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेकवेळा वीजपोल आणि वीजवाहिन्या तुटतात. यातून करंट पास होत असल्याने शॉक बसतो. तालुक्यातील मिरजोळे हनुमाननगर  येथील  शाळेतही तुटलेल्या  वीजवाहिनीच्या  सपोर्टरमधून निघालेल्या करंटमुळे शॉक लागून पहिलीतील विद्यार्थी लोखंडी खांबाला चिकटला. तेथे असणार्‍या शिक्षकाने प्रसंगावधान राखत त्या विद्यार्थ्याला खांबापासून दूर केले, अन् त्या विद्यार्थ्याचे प्राण वाचले.

मिरजोळे  हनुमाननगर  शाळेत 35 विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. शाळेत सावंत या एकच शिक्षिका आहेत. शाळेचे छप्पर आणि शेडसाठी लोखंडी बारचा वापर करण्यात आला आहे. दिव्यांग मुलांना मार्गदर्शन करणारे विशेष शिक्षक नंदकुमार कांबळे गतआठवड्यातील शनिवारी शाळेत गेले होते. सकाळच्या सत्रात शाळा भरल्यानंतर तासाभराने काही विद्यार्थी लघुशंकेसाठी बाहेर आले. यावेळी एक विद्यार्थी अचानक मोठ्याने ओरडू लागला. काय झाले हे पाहण्यासाठी कांबळे आणि सावंत यांनी बाहेर धाव घेतली. 

तेथील लोखंडी बारला धरून एक मुलगा जोराने ओरडत होता. त्याला त्या खांबापासून बाजूला करण्यासाठी कांबळे यांनी त्याला पकडताच त्यांना विजेचा झटका बसला आणि ते बाजूला पडले. त्या मुलाला शॉक लागला असल्याचे यावेळी त्यांचा लक्षात आले. इयत्ता पहिलीत शिकणारा तो मुलगा केविलवाणीपणे ओरडत होता. त्या मुलाला खांबापासून बाजूला करायचेच असे ठरवून कांबळे यांनी त्याचे कपडे पकडून त्याला पूर्ण ताकदनिशी बाजूला ओढले. यावेळी मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि तो मुलगा खांबापासून दूर झाला. आपल्या  प्राणाची बाजी लावून नंदकुमार कांबळे यांनी त्या मुलाचा जीव वाचवला. 

शेडच्या लोखंडी बारमध्ये वीज कशी प्रवाहित झाली हे पाहण्यासाठी कांबळे यांनी मीटरची पाहणी केली. मीटरमधून पावसाचे पाणी जमिनीत झिरपत असल्याचे दिसले. काठीच्या सहायाने ताबडतोब त्यांनी स्वीच बंद केला. तसेच वीज वाहिनीचा तुटलेला सपोर्टर छपराच्या लोखंडी बारलाच गुंडाळून ठेवल्याचे त्यांच्या लक्षात आले. शॉक लागलेल्या विद्यार्थ्याला त्यांनी तातडीने जवळच्या दवाखान्यात दाखल केले.घडलेल्या घटनेची त्यांनी तत्काळ गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील यांना माहिती दिली. उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, विस्तार अधिकारी भोसले यांच्यासह पाटील लगेचच शाळेला भेट दिली. 

महावितरणच्या कर्मचार्‍यांना तातडीने बोलावून दोष दूर केला. गटविकास अधिकारी विद्या गमरे, केंद्र प्रमुख यासुद्धा तेथे पोहचल्या. विद्यार्थ्याच्या घरी भेट घेऊन त्याला आणि त्याच्या पालकांना धीर दिला.

पंचायत समितीकडून सर्व शाळांना सूचना

मिरजोळेतील या घटनेची गंभीर दखल रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभागाने घेतली आहे. सद्यस्थितीत अतिवृष्टी, पूर सदृश्य परिस्थिती, भूस्खलन यासारख्या धोक्यापासून विद्यार्थ्यांना कोणताही अपाय होऊ नये याकरता आवश्यक काळजी घेण्यात यावी. विद्युत मीटर, त्याची जोडणी व सर्व उपकरणे यांची तातडीने तपासणी करून घ्यावी अशा सूचना गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील यांनी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत. केंद्रप्रमुखांनी या सूचना मुख्याध्यापकांना द्यायच्या असून, अहवाल कार्यालयाकडे सादर करायचा आहे.