Sun, Jan 19, 2020 22:09होमपेज › Konkan › भाजपकडून ना. प्रभू यांना खासदारकी?

भाजपकडून ना. प्रभू यांना खासदारकी?

Published On: Apr 19 2018 10:43PM | Last Updated: Apr 19 2018 10:01PMचिपळूण : शहर वार्ताहर

पंतप्रधान मोदी यांचे विश्‍वासू म्हणून ओळख असलेले कोकणचे सुपुत्र केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या खासदारकीसाठी भाजपच्या गोटातून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातीलच पहिला टप्पा म्हणजे ना. प्रभू यांची खास ‘चाय पे चर्चा’ बैठक शुक्रवारी सावर्डे येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रभू हे दोन दिवस चिपळूणच्या दौर्‍यावर येणार आहेत.

भाजपच्या अंतर्गत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार आगामी  लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ना. सुरेश प्रभू यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यानुसार ना. प्रभू यांनी भाजपच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला सुरुवातदेखील केली आहे. रणनीती व नियोजनानुसार निवडणूक प्रचाराचा खास प्रारंभ चिपळूणच्या राजकीय मैदानात केला जाणार आहे. कोकणातील राजकीय केंद्रबिंदू व डावपेचांचा आखाडा असलेल्या चिपळुणात भाजप गोटाकडून प्रभू यांच्या निवडणुकीचा प्रारंभ शुक्रवारी खास संवाद साधून होणार आहे. सावर्डे येथे या खास लोकांसाठी आयोजित केलेल्या ‘चाय पे चर्चा’ संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

भाजप गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवस प्रभू हे चिपळूण दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान भाजपच्या राजकीय रणनीतीची धुरा सांभाळणार्‍या काही खास राखीव राजकीय धुरिणांकडून प्रभू यांच्या संवादाचे नियोजन केले आहे. त्यानुसार, चिपळूण शहर परिसर व तालुक्यातील राजकीय क्षेत्रात स्वत:चे वलय व वजन असलेल्या काही पडद्यामागील राजकीय व्यक्‍तींना या चर्चेसाठी अगत्याचे निमंत्रण दोन दिवसांपूर्वीच खासगी माध्यमातून देण्यात आले आहे.

कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नसलेले मात्र ज्यांच्या प्रभावामुळे राजकीय वर्तुळात मतदारांचा फायदा होईल, अशा अनेक व्यक्‍तींना प्रभू यांच्या या खास संवाद चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. यावेळी संबंधितांना विकासाविषयक व अन्यविषयी मार्गदर्शन करावे. तसेच सूचना व विकासकामांबाबत चर्चा करावी यासाठी बैठकीला उपस्थित रहावे, असे निमंत्रण संबंधितांना देण्यात आल्याचे 
समजते.

चिपळूणच्या मैदानातून सुरूवात
भाजपकडून प्रभू यांना उमेदवारी मिळणार, याची शक्यता बळावू लागली आहे. चिपळूण सर्वच पक्षांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनू लागला आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीची तयारी चिपळूणच्या राजकीय मैदानातून सुरू केली आहे. नुकत्याच होणार्‍या बैठकीत काय होणार? याकडे लक्ष लागले आहे.