Wed, Nov 21, 2018 01:07होमपेज › Konkan › जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पुलांची तपासणी गरजेची

जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पुलांची तपासणी गरजेची

Published On: Jul 16 2018 11:18PM | Last Updated: Jul 16 2018 9:11PMसुरळ : वार्ताहर

कोकणातील जिल्हा अंतर्गत मार्गांवर अनेक ठिकाणी ब्रिटिशकालीन पूल आहेत. यातील अनेक पुलांचे आयुर्मान संपले असून या पुलांवरून वाहतूक करताना भीती व्यक्‍त होत आहे. संबंधित विभागाने आता सर्वच ब्रिटिशकालीन पुलांची डागडुजी अथवा त्या ठिकाणी नवीन पूल उभारावेत, अशी मागणी होत आहे.

महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून  भीषण अपघात घडला होता. या अपघातामध्ये अनेक निष्पाप जिवांचा बळी गेला. 1928  साली बांधलेल्या या पुलाचे आयुर्मान संपल्याचे ब्रिटिश सरकारने भारतीय शासनाला कळविलेही होते. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही मोठी दुर्घटना घडली. यानंतर राज्यभरातील पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले. मात्र, जिल्हा अंतर्गत असलेल्या ब्रिटिशकालीन छोट्या पुलांचे काय, हा प्रश्‍न आजही अनुत्तरीत आहे.  

रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक भागांमध्ये छोटे-छोटे ब्रिटिशकालीन दगडी बांधकामाचे पूल आहेत. या पुलांनी आता शंभरहून अधिक वर्षे भार झेलला आहे. त्यामुळे अशा बहुतांश दुर्लक्षित छोट्या पुलांचेही स्ट्रक्‍चरल ऑडिट होणे गरजेचे आहे. 

या पुलांवरुनही मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी हानी होण्यापूर्वीच धोकादायक ठरणार्‍या पुलांची दुरूस्ती संबंधित विभागाने करणे गरजेचे आहे. प्राधान्याने हे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.