Tue, Jul 07, 2020 07:37



होमपेज › Konkan › अनंत गीतेंनी कोकणसाठी काय केले?

अनंत गीतेंनी कोकणसाठी काय केले?

Published On: Mar 14 2019 2:04AM | Last Updated: Mar 13 2019 11:15PM




चिपळूण : खास प्रतिनिधी

अनंत गीते पंचवीस वर्षे खासदार आहेत. दोनवेळा मंत्री झाले. मात्र, त्यांनी एकदातरी कोकणसाठी व समाजासाठी काय केले हे जाहीरपणे सांगावे. गीते हे वाजपेयी सरकारमध्ये ऊर्जा खात्याचे मंत्री होते. त्यावेळी कोकणात एखादा ऊर्जा प्रकल्प आणता आला असता. आज अवजड उद्योग खात्याचे मंत्री आहेत. मात्र, एकही उद्योग येथे ते आणू शकले नाहीत. हे खाते त्यांच्यासाठी अवघड बनले आहे, अशी टीका सुनील तटकरे यांनी केेली.

चिपळुणातील बाळासाहेब माटे सभागृहात मंगळवारी सायंकाळी रायगड मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील गावांची बैठक झाली. यावेळी  आ.  भास्कर जाधव व सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर शाब्दीक हल्ला चढविला. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जि. प. गटनेते विक्रांत जाधव, शौकत मुकादम, जयंद्रथ खताते, चित्रा चव्हाण, दिशा दाभोळकरआदी उपस्थित होते. 

यावेळी तटकरे म्हणाले, खासदार फंडाच्या पलिकडे गीतेंनी वेगळा निधी आणलाच नाही. त्यामुळे दोन-चार लाखांच्या कामांची भूमिपूजने करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यांच्याकडे विकासाची मानसिकता नाही. गीतेंनी समाजासाठी तरी काय केले हे एकदा जाहीर सांगावे असे  आव्हान दिले. केंद्रात मंत्री असलेल्या गीतेंनी काय केले? अनेकदा कागद प्रकल्प आणू, शेतकर्‍यांनी बांबू लागवड करा असे सांगितले. मात्र, हा प्रकल्प कागदावर   राहिला.

येथील सेनेचे जिल्हाप्रमुख आपल्यावर टीका करतात. मात्र, लोटेतील गुन्ह्यामध्ये त्यांचेही नाव समाविष्ट आहे. आपल्यावर एकही फौजदारी किंवा राजकीय गुन्हा नाही. या सरकारने साडेचार वर्षे चौकशीचा प्रयत्न केला. मात्र, हाताला काही लागले नाही. असा गुन्हा असेल तर आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असे आव्हान तटकरेंनी दिले. 

यावेळी तटकरे म्हणाले,  मोदी सरकारने केवळ ‘चुनावी जुमला’ करुन निवडणूक जिंकली. आज ‘अच्छे दिन’ कुठे गेले? खात्यात येणारे पंधरा लाख रूपये कुठे आहेत? दरवर्षी मिळणारा दोन कोटींचा रोजगार कुठे राहिला? कर्जमाफी कुठे आहे? महिला सुरक्षिततेचे काय? आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकर्‍यांना सहा हजार देणार असे सांगतात. त्यांनी रेल्वेसाठी मोठ्या घोषणा केल्या. मात्र, त्याची बजेटमध्येच तरतूद नाही, असे आरोप करुन केंद्र व राज्य शासनाच्या योजना कशा अपयशी ठरल्या याचा उलगडा केला. 

... तर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करू

 शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व रामदास कदम यांच्यासह सर्वच नेते भाजपवर कडाडून टीका करीत होते. त्यांनीच ‘चौकीदार चोर है’ असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे भाजपविरोधात सेनेने एकही संधी सोडलेली नाही. आम्ही सकारात्मक विकासाचा मुद्दा मांडणार आहेत. मात्र, कुणी खोटे आरोप करेल ते खपवून घेतले जाणार नाही. त्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असे तटकरे यांनी ठणकावून सांगितले.