Sun, Jul 21, 2019 16:15
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › ना. दीपक केसरकर - नीलेश राणेंची ‘हात मिळवणी’!

दीपक केसरकर-नीलेश राणेंची ‘हात मिळवणी’!

Published On: Aug 07 2018 1:00AM | Last Updated: Aug 07 2018 1:00AMकुडाळ : प्रमोद म्हाडगुत

माजी मुख्यमंत्री नारायण राणे व पालकमंत्री दीपक केसरकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र, कुडाळ येथील सिंधु एज्युकेशन एक्स्पो कार्यक्रमाला योगायोगाने राणेंचे पुत्र माजी खा. नीलेश राणे व पालकमंत्री दीपक केसरकर  एकाच व्यासपीठावर आले. भाषण सुरू असतानाच ना. केसरकर यांचे सभागृहात आगमन होताच ‘सन्माननीय पालकमंत्री दीपक केसरकर साहेब’ असा नीलेश राणे यांनी नामोल्‍लेख करत त्यांचे आदरातिथ्य केले. ना. केसरकर यांनी सुद्धा हात उंचावत राणे यांना आपल्या शैलीत प्रतिसाद दिला. नीलेश राणे यांचे भाषण संपताच व्यासपीठाकडे आसनस्थ होत असलेल्या राणे यांना केसरकर यांनी हस्तांदोलन केले व ते भाषणासाठी उभे राहिले. भाषण संपताच पुन्हा ना. केसरकर यांनी राणे यांना हस्तांदोलन करत काही शब्दांची करत देवाण-घेवाण स्मितहास्य केले. कट्टर विरोधक असलेल्या राणे-केसरकर यांचे व्यासपीठावरील  ही ‘हात मिळवणी’ पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

कुडाळ वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे सुरू असलेल्या एज्यु. एक्स्पोला भेट देण्यासाठी सोमवारी सकाळी 10 वा. माजी खा. नीलेश राणे तर 10.30 वा. ना. दीपक केसरकर येणार होते. नीलेश राणे येणार असल्याने प्रवेशद्वारावरच स्वाभिमानचे पदाधिकारी कार्यकर्ते स्वागतासाठी उभे होते. अर्ध्या तासाने कार्यक्रमस्थळी आलेल्या नीलेश राणे यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले व ते स्टॉलला भेट देत व्यासपीठावर गेले व आपले भाषण सुरू केले. दरम्यान, पालकमंत्री दीपक केसरकर कार्यक्रमस्थळी हजर होताच नीलेश राणे यांनी आदरपूर्वक पालकमंत्री दीपक केसरकर साहेब यांचे आताच आगमन होत असल्याचे बोलून स्वागत केले. त्याला ना. केसरकर यांनी हात उंचावत प्रतिसाद दिला व ना. केसरकर व्यासपीठावर आले. यावेळी जि.प. अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर ते आसनस्थ झाले. नीलेश राणे यांचे भाषण संपताच व्यासपीठावर बसण्यासाठी येत असलेल्या राणे  यांना हस्तांदोलनासाठी ना. केसरकर यांनी हात पुढे करताच दोघांनी हस्तांदोलन करत स्मितहास्य केले. त्यानंतर ना. केसरकर भाषणाला उभे राहाताच त्यांनी सुद्धा  ‘आदरणीय नीलेशजी राणे’ असा उल्लेख केला. भाषण संपताच ना. केसरकर यांनी नीलेश राणेंकडे जात हस्तांदोलन केले. यावेळी दोघांनी स्मित हास्य करत संवाद साधला. त्यानंतर ना. केसरकर यांनी उपस्थित जि.प. अध्यक्षा रेश्मा सावंत, रणजित देसाई, सतीश सावंत, अ‍ॅड. अजित भणगे, डॉ. प्रसाद देवधर यांना हात उंचावला व ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. हे सर्व चित्र राजकीय पटलावर कट्टर विरोधक असलेल्या केसरकर-राणे यांचे होते. हे पाहून उपस्थित शेकडोजण अवाक् झाले.