Sat, Mar 23, 2019 01:55होमपेज › Konkan › खेडमध्ये 25 रोजी मूक मोर्चा

खेडमध्ये 25 रोजी मूक मोर्चा

Published On: Jul 22 2018 10:35PM | Last Updated: Jul 22 2018 10:15PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील सुकिवली येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण खून करणार्‍या सूर्यकांत नवनाथ चव्हाण याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या मागणीसह ‘त्या’ मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवार, दि. 25 जुलै रोजी खेड तालुक्यातील महिलांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

येथील महिला दक्षता समितीच्या सदस्य नंदिनी खांबे आणि संजना कुडाळकर यांनी या मोर्चाचे आयोजन केले आहे. या संदर्भात  खेड पोलिसांनादेखील निवेदन दिले आहे. या मोर्चामध्ये खेड तालुक्यातील प्रत्येक गावातील महिला व पुरुष तसेच महाविद्यालयीन तरुण-तरुणी सहभागी होणार आहेत. हा मोर्चा बुधवार, दि.25 जुलै रोजी शहरातील छत्रपती शिवाजी चौकातून सकाळी 11 वाजता निघणार आहे. यानंतर बसस्थानक, वाणी पेठ, बाजारपेठ, निवाचा तळ, गांधी चौक, तीनबत्ती नाका, हुतात्मा अनंत कान्हेरे चौक ते कॅफे कॉर्नर मार्गे पोलिस ठाण्यापर्यंत मूक मोर्चा नेण्यात येणार आहे. यावेळी पोलिसांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात येईल. 

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा, आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी पोलिस ठाण्यात खास महिला सुरक्षा कक्ष तयार करावा, खेड पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, पोलिस मित्र म्हणून महिला, महाविद्यालयांतील विद्यार्थिनींची निवड करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.