Mon, Mar 25, 2019 17:28होमपेज › Konkan › पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देणार दूध भुकटी

पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देणार दूध भुकटी

Published On: Aug 23 2018 10:53PM | Last Updated: Aug 23 2018 10:38PMकणकवली : प्रतिनिधी

राज्यातील शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पात्र असलेल्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दूध भुकटी दिली जाणार आहे. या भुकटीपासून तयार केलेले दूध देण्यासाठी एका विद्यार्थ्यासाठी एक महिन्याच्या कालावधीसाठी 200 ग्रॅम दूध भुकटीचे एक पॅकिट असे तीन महिन्यासाठी एकूण 600 ग्रॅमची तीन पॅकेट विद्यार्थ्यांना घरी दिली जाणार आहेत. या दूध भुकटीतून पालकांनी त्यांच्या पाल्यांना दूध भुकटीपासून घरी दूध तयार करून देणे अपेक्षित आहे. ही योजना केवळ तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर राबविली जाणार आहे.

राज्यात सद्यस्थितीत निर्माण झालेल्या अतिरिक्त दूध व दूध भुकटीच्या संदर्भात शासनस्तरावरून करण्यात येणार्‍या उपाययोजनांबाबत 10 जुलै रोजी शासनाच्यावतीने विधानसभेत निवेदन करण्यात आले होते. सदर निवेदनामध्ये राज्यात विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या पोषण आहार योजनेमध्ये दूध अथवा दूध भुकटीचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे नमुद केले होते. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 12 जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कर्नाटक राज्यातील ‘क्षीर भाग्य’ योजनेचा अभ्यास करून शालेय पोषण आहार योजनेतील लाभार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेस पुरक योजना दूध भुकटी वाटप योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

या दूध भुकटीचे वाटप विद्यार्थ्यांना एकाच दिवशी संबंधित शाळेने दूध भुकटी वाटप दिवस जाहीर करून शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत करावयाचे आहे. संबंधित विद्यार्थ्यांना दूध भुकटीची तीन पॅकेट दिली जाणार आहेत. पालकांना दूध भुकटीपासून दूध कसे तयार करायचे याबाबतच्या सविस्तर सुचना याच दिवशी दिल्या जाणार आहेत. ही योजना केवळ तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर राबविली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात उत्पादित झालेली दूध भुकटीच विद्यार्थ्यांना पुरविली जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी समितीही गठीत करण्यात आली आहे.