होमपेज › Konkan › प्रज्ञावंत विद्यार्थी करणार विमानाने ‘इस्रो’ची सफर!

प्रज्ञावंत विद्यार्थी करणार विमानाने ‘इस्रो’ची सफर!

Published On: Apr 17 2018 10:41PM | Last Updated: Apr 17 2018 10:41PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व त्यांना विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठीची प्रेरणा मिळावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने भारतरत्न माजी राष्ट्रपती  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले होते. त्याला संपूर्ण जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. या परीक्षेत इयत्ता चौथीमधून 4,177 आणि सातवीमधून 1,995 एवढे विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून तालुकास्तरावर गुणानुक्रमे तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा लवकरच होणार आहे. तर सातवीमध्ये निवड झालेल्या 24 विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विमानाद्वारे ‘इस्रो’ केंद्राच्या वैज्ञानिक सहलीचा आनंद लुटता येणार आहे, अशी माहिती जि. प. अध्यक्षा सौ.  रेश्मा सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा, मार्च 2018 चे निकाल जाहीर झाले असून ते जाहीर करण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.  उपाध्यक्ष रणजीत देसाई, शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ, प्राथमिकचे  उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, सर्वशिक्षा अभियानाच्या स्मिता नलावडे उपस्थित होत्या. 

जि. प. कृषी मेळाव्यांच्या यशस्वी आयोजनानंतर जि. प. ने  जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष लक्ष दिले आहे.  याचाच एक भाग म्हणून प्रथमच  जि.प.तर्फे या प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह आणि शिक्षणाधिकारी गजानान गणबावले यांचेही यात मोठे योगदान असल्याचे  अध्यक्षा सौ. सावंत यांनी सांगितले.

या विद्यार्थ्यांना मिळणार विमान प्रवासाची संधी विमान प्रवासाची संधी प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये देवगड तालुका- स्वजय चंद्रकांत कदम (जि. प. शाळा सौंदाळे), प्रतीक सुदेश कानेरे ( जि.प. शाळा सौंदाळे), साक्षी सतीश हिंदळेकर (जि. प. शाळा हिंदळे), दोडामार्ग- कुंदन उत्तम कुडव (जि.प. शाळा घोटगेवाडी), साहिल गणेश शिरसाट (सोनावल), पुष्पलता सत्यवान गावडे (मणेरी नं.1), कणकवली- सानिका सुधाकर कुलकर्णी (वारगाव नं.1), श्रीयश विनायक गुरव (दारिस्ते नं.1), रघुनंद जितेंद्र राणे (कणकवली नं. 3), कुडाळ- पलाशा राजस सामंत (झाराप- कामळेवीर), आर्या दत्तराज श्रुंगारे (नेरूर नं. 1), प्रियांका प्रेमनाथ मांजरेकर (झाराप- कामळेवीर), मालवण- प्राची सूर्यकांत चोपडेकर (आचरा- पीरवाडी), राज ज्ञानदेव लाड (गोळवण नं. 1), खुशी दिलीप तोडणकर (आचरा-पीरवाडी), सावंतवाडी- जयराम गणपत गावडे (तळवणे नं. 1),  साक्षी देवू मसुरकर (निरवडे- कोनापाल), पूजा पांडुरंग सरमळकर (तळवडे नं.3), वैभववाडी-श्रावणी चंद्रकांत नर (नाधवडे नं. 1), दिव्या रवींद्र सुतार, मयुरी भालचंद्र रावराणे (लोरे नं. 1), वेंगुर्ले-तनया मनोहर धुरी, नेत्रा शंकर नाईक (वेतोरे नं. 1), दीपाली उमेश तेरेखोलकर (परबवाडी नं. 1).

जि.प.स्तरावर आलेले पहिले तीन नंबर 
इयत्ता चौथी-समृद्धी कृष्णा गवस (आडाळी नं.2, दोडामार्ग), स्नेहल केशव पाटील (कळणे नं. 1, दोडामार्ग), आयुष अविनाश आंधळे (अरुळे, वैभववाडी) इयत्ता सातवी-प्राची सूर्यकांत चोपडेकर (आचरा-पीरवाडी, मालवण), कुंदल उत्तम कुडव (घोटगेवाडी, दोडामार्ग), सानिका सुधाकर कुलकर्णी (वारगाव नं. 1, कणकवली)

नियोजन सुरू 
इयत्ता सातवीमधून आठही तालुक्यांमधून प्रत्येकी पहिले तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना बेंगलोर, त्रिवेंद्रम किंवा श्रीहरी कोटा या ठिकाणच्या  ‘इस्रो’च्या केंद्राची वैज्ञानिक सहल घडविली जाणार आहे. यासाठीचे नियोजन सुरू असून यासाठी एक प्रवास विमान आणि एक प्रवास रेल्वे असा करण्यात येणार आहे. यासाठी 24 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून यासोबत दोन शिक्षक व एक वैद्यकीय अधिकारी असणार असल्याचेही अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले.