Tue, Feb 19, 2019 20:18होमपेज › Konkan › चौकुळ घटप्रभा नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

चौकुळ घटप्रभा नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 1:01AMआंबोली : वार्ताहर

चौकुळ - मळववाडी येथे घटप्रभा नदीत वडील व चुलत भाऊ यांच्यासोबत मासे पकडायला गेलेला साई शंकर गावडे (वय 18 रा. गावडेआळी-चौकुळ) याचा मंगळवारी रात्री 8 वा. च्या सुमारास बुडून मृत्यू झाला. नदीतील पापडी पूल परिसरात ही दुर्घटना घडली. 

साई गावडे हा शिक्षणानिमित्त कोल्हापूर येथे राहात होता. यावर्षी त्याने 12 वीची परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर तो गावी चौकुळ येथे आला होता. मंगळवारी सायंकाळी 7 वा. च्या सुमारास  तो वडील शंकर गावडे,चुलत भाऊ रुपेश व सोनू यांच्यासोबत मासे पकडण्यासाठी चौकुळ- मळववाडी येथे पापडी पूल परिसरात घटप्रभा नदीत गेला होता. मासे पकडण्याच्या नादात साई हा खोल पाण्यात गेला.त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला,त्यात दाट अंधार असल्याने तो नेमका पाण्यात कुठे बुडाला समजले नाही.

वडील व भावावी त्याचा शोध घेतला असता तो सापडून आली नाही. दरम्यान, याबाबतचे वृत्त गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत नदीच्या डोहात शोध मोहीम राबवली. रात्री 12 वा. पर्यंत शोध करूनही साई सापडला नाही. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

सकाळी 7.45 वा.  साईचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला. या घटनेची खबर पोलिस पाटील प्रशांत गावडे यांनी आंबोली पोलिसांना दिली. घटनेचा पुढील तपास आंबोली  पोलिस करत आहेत! साई याच्या पश्‍चात आई-वडील व बहीण असा परिवार आहे.  घटनास्थळ व त्यानंतर आंबोली आरोग्य केंद्रात नातेवाईक व चौकुळ ग्रामस्थांनी गर्दी केली होती.