Mon, Jun 24, 2019 21:03होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात महामार्गावर चक्काजाम आंदोलन (Video)

सिंधुदुर्गात महामार्गावर चक्काजाम आंदोलन (Video)

Published On: Jul 17 2018 7:12PM | Last Updated: Jul 17 2018 7:12PMकुडाळ : काशिराम गायकवाड

कुडाळ एकजूटीचा विजय असो, कुडाळ तालुका बचाव समितीचा विजय असो, आमच्या मागण्या मान्य करा, हम सब एक है, जिल्हा प्रशासन आणि हायवे अॅथॉरेटीचा निषेध असो अशा घोषणा देत कुडाळ येथे कुडाळ तालुका बचाव समितीने मंगळवारी मुंबई - गोवा महामार्गावर महामार्ग रोको आंदोलन करीत कसाल ते झाराप पर्यंतच्या चौपदरीकरणातील समस्यांबाबत शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान कुडाळसह तालुक्यात झाराप, तेर्सेबांबर्डे, बिबवणे, वेताळबांबर्डे, हुमरमळा येथेही महामार्गावर बचाव समिती अंतर्गत आंदोलन करून वाहतूक रोखण्यात आली. यात सुमारे दोन तास महामार्गावरील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली. ही तर आंदोलनाची एक झलक होती मागण्या पूर्ण न झाल्यास भविष्यात तीव्र स्वरूपात रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी कुडाळ बचाव समितीने यावेळी दिला.

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील कुडाळ तालुक्यातील कसाल ते झाराप पर्यंतच्या विविध प्रश्नांबाबत सर्वपक्षीय व कुडाळवासिय यांनी एकत्र येत कुडाळ तालुका बचाव समिती स्थापन करून जिल्हाधिका-यांसह हायवे अॅथॉरेटी प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने या समितीने मंगळवारी महामार्ग रोको आंदोलनाची हाक दिली. कुडाळात मोठे सर्कल व्हावे, झाराप ते कसाल दरम्यान ठिकठिकाणी अंडरपास, सर्विस रोड व्हावेत अशा प्रमुख मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका बचाव समितीने मंगळवारी कुडाळ राज हॉटेल जवळ महामार्ग रोको आंदोलन छेडले. समितीचे अध्यक्ष अॅड. राजीव बिले यांच्यासह या समितीतील सर्वस्वी भाजपाचे जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर, शिवसेनेचे जि.प.सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत,मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, सभापती राजन जाधव, उपसभापती सौ.श्रेया परब, मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, महिला जिल्हाध्यक्षा सौ.चैताली भेंडे, माजी सभापती सुनील भोगटे, स्वाभिमानचे आनंद शिरवलकर, संजय भोगटे, बाबल गावडे, सौ.निता राणे, सौ.अस्मिता बांदेकर, सौ.शिल्पा घुर्ये, सौ.संध्या तेरसे, सौ.प्रज्ञा राणे, सौ.मेघा सुकी, भाऊ शिरसाट, आबा धडाम, बाळा वेंगुर्लेकर, सचिन काळप, गणेश भोगटे, सुनील बांदेकर, मिलिंद नाईक, वर्षा कुडाळकर, बाळा कोरगांवकर, पप्या तवटे, आनंद भोगले, राजन बोभाटे, संजय बोभाटे, प्रशांत राणे, सर्फराज नाईक, संजय वेंगुर्लेकर, आपा भोगटे, चंद्रकांत अणावकर, रूपेश कानडे, सदा अणावकर, सुधीर भणगे,  मकरंद नाईक, नागेश नेमळेकर, राजू गवंडे आदींसह सर्वपक्षीय व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

तालुक्यात कुडाळसह वेताळबांबर्डे, हुमरमळा,बिबवणे, तेर्सेबांबर्डे, झाराप येथे महामार्ग रोको आंदोलन छेडण्यात आले. सर्वत्र आंदोलनादरम्यान सुमारे दोन तास महामार्गावरील वाहतूक पुर्णतः ठप्प झाली. ठिकठिकाणी महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आंदोलक कुडाळ पोलिसांच्या ताब्यात

कुडाळसह तालुक्यातील सर्व ठिकाणच्या आंदोलनातील सुमारे 70 आंदोलनकर्त्यांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडण्यात आले.