Thu, Apr 18, 2019 16:04होमपेज › Konkan › कणकवलीत कडकडीत बंद

कणकवलीत कडकडीत बंद

Published On: Dec 08 2017 1:39AM | Last Updated: Dec 07 2017 10:17PM

बुकमार्क करा

कणकवली : शहर वार्ताहर 

महामार्ग चौपदरीकरणात बाधित होणार्‍या कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाईत प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने निवाडा करून अत्यंत कमी मोबदला निश्‍चित केला. त्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी कणकवलीतील प्रकल्पग्रस्त आणि व्यापारी बांधवांनी मूकमोर्चा काढून शासनाचा निषेध केला. या मोर्चात कणकवलीतील सर्वपक्षीय नेतेमंडळीही सहभागी झाले होते. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी दिवसभर कणकवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मोर्चातून प्रकल्पग्रस्तांनी शासन आणि प्रशासनाला आपली एकजूट दाखवून दिली. 

परमहंस भालचंद्र महाराज संस्थानकडून सकाळी 9.30 वा. सुरू झालेला मूकमोर्चा पटकीदेवी मार्गे-बाजारपेठेतून पटवर्धन चौक ते प्रांत कार्यालय असा काढण्यात आला. या मोर्चातील सहभागी प्रकल्पग्रस्तांच्या हातात शासनाचा निषेध करणारे फलक होते. शिवाय प्रकल्पग्रस्तांनी काळ्या फितीही बांधल्या होत्या. राजन तेली यांनीही प्रांत कार्यालयाजवळ उपस्थित राहून प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. हा मोर्चा प्रांत कार्यालयाच्या गेटवर येऊन स्थिरावला. सर्वांनी एका जागी स्तब्ध उभे राहत राष्ट्रगीत म्हटले. प्रांत कार्यालयाच्या गेटला निषेधाचे फलक व काळ्या फिती बांधण्यात आल्या. त्यानंतर गेटवरच मागण्या पूर्ण होण्याचे मालवणी भाषेतील गार्‍हाणे घातले. आणि मूकमोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रकल्पग्रस्त उदय वरवडेकर यांनी  कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांना 
शासनाने चुकीच्या पद्धतीने निवाडा करून तुटपुंजी भरपाई निश्‍चित केली आहे. ही तुटपुंजी भरपाई प्रकल्पग्रस्तांना मान्य नसून हा अन्याय आहे. सध्याच्या बाजारभावानुसार जास्तीत जास्त नुकसानभरपाई प्रकल्पग्रस्तांना मिळाली पाहिजे. आयुष्यभर मेहनत करून उभा केलेला व्यापार धंदा उद्ध्वस्त होता कामा नये. जमीन आणि मालमत्तांचे मूल्यांकन करताना नगरपंचायत आणि मालकांना प्रशासनाने विश्‍वासात घेतले नाही़   जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांना पूर्णपणे न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा देत राहू, शासनाने आमचा अंत पाहू नये, अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.