होमपेज › Konkan › समुद्र खवळला

समुद्र खवळला

Published On: Apr 22 2018 11:21PM | Last Updated: Apr 22 2018 11:15PMमालवण :  वार्ताहर 

समुद्री उधाणाचा जोरदार तडाखा रविवारी जिल्ह्याच्या विशेषतः मालवण किनारपट्टी भागास बसला. समुद्राच्या अजस्र लाटांच्या मार्‍यामुळे उधाणाचे पाणी किनार्‍यावर घुसल्याने मच्छीमारांच्या होड्यांना धोका निर्माण झाला होता. या नौका सुरक्षित ठिकाणी हलविण्यास मच्छीमारांची  एकच धावपळ उडाली होती.  दुसरीकडे, किल्ला प्रवासी होडी वाहतूक, तसेच जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना देऊनही किल्ला प्रवासी होडी वाहतूक, तसेच काही पर्यटन व्यावसायिकांनी जलक्रीडा व्यवसाय सुरू ठेवल्याचे दिसून आले. परिणामी, पर्यटकांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे  चित्र मालवणात दिसून आले.

भारतीय हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार, शनिवारपासूनच किनारपट्टी भागात वार्‍याचा जोर वाढला होता. या पार्श्‍वभूमीवर मच्छीमार, तसेच पर्यटन व्यावसायिकांना सतर्कतेचा इशारा बंदर विभागाने दिला होता. रविवारी दुसर्‍या दिवशी दुपारी 2.30 वा.पासून समुद्राच्या मोठ्या लाटा किनारपट्टी भागात उसळू लागल्या. या समुद्री उधाणामुळे काही वेळातच लाटांचा वेग वाढल्याने समुद्राचे पाणी किनारपट्टीवरून आत घुसू लागले. त्यामुळे किनार्‍यावर काही अंतरावर उभ्या करून ठेवलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या होड्यांना धोका निर्माण झाला. उधाणाचे पाणी आत घुसत असल्याचे निदर्शनास येताच मच्छीमारांनी किनार्‍यावर धाव घेत  होड्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यास सुरुवात केली. देवबाग, तारकर्ली, दांडी, वायरी भूतनाथ, चिवला वेळा, बंदर जेटी परिसरास समुद्री उधाणाचा तडाखा बसला. सायंकाळी उशिरापर्यंत किनार्‍यावरील होड्या बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

पर्यटकांची सुरक्षा रामभरोसेच  
हवामान खात्याने केलेल्या सूचनेनुसार येथील मत्स्यव्यवसाय विभाग तसेच बंदर विभागाच्यावतीने मच्छीमार बांधवांना तसेच जलक्रीडा व्यावसायिकांना आपले व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. यात मच्छीमारांनी आपला व्यवसाय बंद ठेवल्याचे दिसून आले. दरम्यान रविवार असल्याने येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. येथील बंदर जेटी परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होती. यात किल्ला प्रवासी होडी वाहतूक सायंकाळी 5.30 वा. पर्यंत सुरू होती. काही पर्यटन व्यावसायिकांनी आपले जलक्रीडा व्यवसाय सुरू ठेवल्याचे दिसून आले त्यामुळे पर्यटकांची सुरक्षितता रामभरोसेच असल्याचे चित्र होते. तर  रविवार असल्याने बंदर विभागाचे कार्यालय बंद होते. त्यांनी काल पर्यटन  व्यावसायिकांना नोटीसा बजावत सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याची कार्यवाही काही पर्यटन व्यावसायिकांकडून झाली नसल्याचे दिसून आले.

पावसाळ्यापूर्वी मिळतात असे  निसर्गाचे संकेत 
मच्छीमारांच्या मते पावसाळ्यापूर्वी असे समुद्रास उधाण येते. काल मत्स्य व्यवसाय विभागाच्यावतीने मच्छीमारांना सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मच्छीमारांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. रविवारी वार्‍याचा जोर  कमी झाला होता. मात्र, दुपारी अडीच वाजल्यानंतर समुद्राच्या  अचानक अजस्त्र लाटा किनार्‍यावर  धडकण्यास सुरवात झाली. समुद्री उधाणाचे पाणी किनार्‍यालगत घुसल्याने किनार्‍यावर  उभ्या  करून ठेवलेल्या होड्यांना धोका निर्माण झाला होता. दांडी येथील मोरयाचा धोंडा येथेही समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात घुसले होते.

 मासेमारी ठप्प
सागरी उधाणामुळे सर्वप्रकारची मासेमारी शनिवारपासून ठप्प झाली आहे. यामुळे बाजारात माशांचे दर चांगलेच वधारले आहेत. पर्यटक व मत्स्य खवय्यांना याचा फटका बसला आहे. शिवाय, मासळी उपलब्ध होत नसल्याने स्थानिक मच्छीविक्रेतेही आर्थिक अडचणीत सापडले आहेत.