Tue, Aug 20, 2019 04:54होमपेज › Konkan › कुडाळला वादळी पावसाचा तडाखा

कुडाळला वादळी पावसाचा तडाखा

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 11:23PMकुडाळ : प्रतिनिधी

कुडाळ शहराला सोमवारी मध्यरात्री मान्सूनपूर्व  पावसाचा तडाखा बसला. या वादळी  वार्‍यात कुडाळ-भैरववाडी, मजिद मुहल्‍ला, कविलकट्टा केळबाईवाडी, कुंभारवाडी, पावशी मिटक्याचीवाडी येथे  झाडे मोडली, तर काही ठिकाणी विद्युत पोल पडून तारा तुटल्या. झाडे घरांवर पडल्याने मोेठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.  या वादळामुळे महावितरणचे पोल पडून तारा तुटल्याने सोमवारी मध्यरात्रीपासून कुडाळ तालुक्यात बर्‍याच ठिकाणी लाईट गुल झाली. मंगळवारी सकाळी महावितरणच्या पथकाने  वीजपुरवठा सुरळीत केला.

सोमवारी संध्याकाळी  कुडाळ तालुक्यात मान्सूनपूर्व  पावसाने हजेरी लावली  लावली. मात्र, वादळी वारा नसल्याने मोठे नुकसान झाले नाही. पण, रात्री 12 वा.च्या सुमारास  अचानकपणे सोसाट्याचा वारा आला. या वार्‍याची तीव्रता एवढी मोठी होती की कुडाळ रेल्वेस्टेशन रोडवरील  सिद्धिविनायक हॉलसमोरील पोल  तारांसह  जमिनीवर कोसळला. एक रिक्षाचालक त्याच मार्गाने जात होता. सुदैवाने त्याने  रिक्षा थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.  केळबाईवाडी येथील उदय कृष्णाजी  कुडाळकर यांच्या घरावर माडाचे झाड, तर प्रदीप गजानन कुडाळकर यांच्या घराच्या छपरावर आंब्याचे झाड कोसळून नुकसान झाले. पावशी-मिटक्याचीवाडी  येथे मधुकर करंगुटकर यांच्या घरावर माड पडून छपराचे नुकसान झाले. तसेच अंगणात असलेल्या अल्टो कारचे नुकसान झाले. असेच नुकसान कुडाळ-भैरववाडी, कविलकट्टा, मजिद  मुहल्‍ला आदीसह तालुक्यात ठिकठिकाणी  झाली. ज्या ठिकाणी वादळाचा मोठा तडाखा बसला, त्या ठिकाणी विजेच्या व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. महावितरणने  मंगळवारी सकाळीच युद्धपातळीवर  काम हाती घेत दुपारनंतर शहरातील  वीजपुरवठा सुरळीत केला.

नुकसानीचा ‘महसूल’ला पत्ताच नाही! 

कुडाळ शहरात  वादळी वार्‍याने मोठे नुकसान झाले. मात्र, मंगळवारी दुपारी 1 वा.पर्यंत कुडाळ तहसीलच्या आपत्ती विभाग कक्षात नुकसानीची एकही नोंद नव्हती. 1 जूनपासून प्रतिवर्षी तहसीलमध्ये आपत्ती विभाग कक्ष कार्यरत होत असला, तरी त्या अगोदर आलेल्या आपत्तीत झालेल्या नुकसानीची महसूल यंत्रणेकडे तत्काळ नोंद नको का, असा सवाल कुडाळवासीयांमधून उपस्थित करून तहसील विभागाच्या या सुस्त कारभाराबाबत नाराजी व्यक्‍त केली जात आहे.