Fri, Jul 19, 2019 22:18होमपेज › Konkan › कोकणात वादळी पावसाचा इशारा

कोकणात वादळी पावसाचा इशारा

Published On: Feb 24 2018 1:14AM | Last Updated: Feb 23 2018 9:59PMरत्नागिरी : प्रतिनिधी

बदलत्या अनिश्‍चित वातावरणामुळे जिल्ह्यात मळभी वातावरणात अवकाळीची  शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यानुसार  शनिवारी जोरदार वादळी वार्‍याच्या साथीने विजांच्या कडकडांसह पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. या इशार्‍याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतर्कता बाळगण्याच्या सूचना    देण्यात आल्या आहेत. 

मध्यंतरी झालेल्या वातावरणातील बदलाने जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. ऐन आंबा हंगामाच्या आरंभालाच  खोे घातल्याने आंबा मोहराला निर्माण  होणार्‍या संभाव्य  धोक्याने बागायदार धास्तावले होते. मात्र, गेले काही दिवस  पडलेल्या उबदार थंडीच्या दुलईमुळे आंबा मोहराच्या संजीवनीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने   बागायदारांना दिलासा मिळाला होता. मात्र, गेले तीन चार दिवस सकाळच्या वेळी दाट धुके पडत असून, थंडीचा कडाकाही हळूहळू कमी होऊ लागला आहे.

दरम्यान, मंगळवारपासून आणखीन काही दिवस असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. त्यानुसार शुक्रवारी कोकण किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह  जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्याला वादळी वार्‍याचीही साथ राहणार असल्याचे वेधशाळेने आपल्या हवाई संदेशात नमूद केले आहे.