Fri, Apr 26, 2019 17:57होमपेज › Konkan › खराब हवामानामुळे मासेमारीची सांगता

खराब हवामानामुळे मासेमारीची सांगता

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 10:56PMरत्नागिरी : प्रतिनिधी

मासेमारीचा हंगाम आता संपला आहे. त्यामुळे बंदरांवरील हालचाल मंदावली आहे. मत्स्य विभागाने 1 जून ते 31 जुलै दरम्यान यांत्रिकी नौकांच्या माध्यमातून खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातल्याने बंदी काळात मासेमारी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. असे असताना मासेमारी बंदीच्या दहा दिवस आधीच जिल्ह्यातील मच्छीमारांनी बदललेल्या हवामानाच्या भीतीने मासेमारी बंद केली आहे. दहा दिवस आधीच हंगामाची सांगता झाली आहे.

जिल्ह्यात एकूण 3 हजार 950 नौका असून यापैकी यांत्रिकी नौका 2 हजार 387 आणि 1500 ट्रॉलर्स तर 602 गिलनेट नौका आहेत. याशिवाय बिगर यांत्रिकी नौका 1 हजार 563 इतक्या आहेत. जिल्ह्याची मच्छीमार लोकसंख्या 67 हजार 615 असून एकूण मच्छीमार गावे 104 आहेत.

महाराष्ट्र मासेमारी अधिनियम 1981 चे कलम 4 चे पोटकलम 1 नुसार मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी 1 जून ते 31 जुलै पर्यंत यांत्रिकी नौकांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी जाहीर केली आहे. या बंदीची माहिती सर्व मच्छीमार संस्थांना देण्यात आली आहे. जिल्ह्यातील चार मासेमारी झोन आहेत. यामध्ये बुरोंडी, दाभोळ, मिरकरवाडा, रत्नागिरी यांचा समावेश आहे. 

पर्ससीनवर राज्य शासनाने लागू केलेल्या मासेमारी निर्बंधामुळे शेकडो पर्ससीन नौका बंदरातच उभ्या आहेत. तर मागील काही दिवसांपासून बदललेले वातावरणाने बिगर यांत्रिकी नौकांनीही बंदरांचा आधार घेतला आहे. पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. पावसाळ्यापूर्वी प्रजननासाठी मासळी किनार्‍यालगत येऊन अंडी देते. ही मासळी मिळवण्यासाठी अनेकदा मच्छीमार समुद्रात धाव घेतात. परिणामी प्रजनन प्रक्रिया योग्य पद्धतीने होत नसल्याने मागील काही कालावधीपासून मच्छीमार हंगाम तोट्याकडे चालला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिरकरवाडा हे सर्वात मोठे बंदर असून जिल्हाभरात लहान आणि मध्यम स्वरूपाची अशी सुमारे 40 बंदरे आहेत. या सर्व बंदरामध्ये पावसाळापूर्व कामांनी वेग घेतला आहे. जिल्ह्यात सध्या मासेमारी नौका किनार्‍यावर आणण्याचे काम सुरू आहे. 40 टक्के नौका किनार्‍यावर आणण्याचे काम पूर्ण झाले आहे. मिरकरवाडा बंदरामध्ये नौका किनार्‍यावर ओढण्याचे काम सुरू आहे. खोल समुद्रात मासेमारी करताना नौका खार्‍या पाण्यामुळे खराब होतात. त्यामुळे नौकांची दुरूस्ती हाती घेण्यात आली होती. प्रत्येक मासेमारी नौकेला नवीन लाकूड, वंगण, तेल, रंग आणि 4 महिने पावसापासून संरक्षण करण्यासाठी लागणार्‍या ताडपत्री टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते.

केरळसह अन्य किनारपट्टी भागात 1 जूनपासून मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत या भागातील मासेमारी व्यवसाय बंद असल्याने महाराष्ट्रातही 1 जूनपासून मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समुद्र किनार्‍यावरील सर्व बंदरामध्ये 1 जून ते 31 जुलै या कालावधीत मासेमारीवर शासनाकडूनच बंदी घातली आहे.