Thu, Apr 25, 2019 13:46होमपेज › Konkan › कुडाळात एसटी बसेसवर दगडफेक

कुडाळात एसटी बसेसवर दगडफेक

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 26 2018 10:17PMकुडाळ : प्रतिनिधी 

सकल मराठा मोर्चाच्या जिल्हा बंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कुडाळ तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यावर  पेटते टायर व  झाडे तोडून वाहतूक बंद करण्यात आली. कुडाळ आगाराच्या सात गाड्या ग्रामीण भागात अडकल्या तर आंदोलकांनी एसटीच्या चार गाड्यांवर दगडफेक केली. ‘जय भवानी जय शिवाजी.... कोण म्हणतंय देणार नाय घेतल्याशिवाय जाणार नाय....’ अशा गगनभेदी घोषणा देत कुडाळ शहरात लक्षवेधी रॅली काढली. आंदोलनादरम्यान एका मुलांवर साळगांवमध्ये लाठीचार्ज झाल्याचे पडसाद कुडाळमध्ये उमटले. अखेर पोलिस निरिक्षक जगदीश काकडे यांनी दिलगिरी व्यक्‍त केल्यानंतर हा जनक्षोभ शांत झाला. सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.सुहास सावंत यांनी  आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आभार मानत ही एकजूट अशीच कायम ठेवा, असे आवाहन केले व  आंदोलन संपल्याचे जाहीर केले. 

कुडाळ येथील आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर एस्आरएम कॉलेज चौकात गुुरूवारी सकाळी 8 वा. मराठा समाजाचे आंदोलक एकत्र जमू लागले. काही वेळातच मोठ्या प्रमाणात आंदोलक एकत्र आल्यानंतर त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. चौकातून जाणार्‍या गाड्यांना त्यांनी माघारी पाठवले. शहरातील तीनही पेट्रोलपंप, सॉ मिल बंद पाडत फडणवीस सरकारचा निषेध केला.  आंदोलकांनी शहरातून लक्षवेधी रॅली काढत जिजामाता चौकामध्ये जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. ही रॅली हॉटेल गुलमोहरमार्गे पुन्हा कॉलेज चौकात असता जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम  यांनी आंदोलकांच्या प्रमुखांना शांततेत आंदोलन करण्याच्या सूचना केल्या.

कुडाळ काळप नाका येथून जाणार्‍या स्कूल बस पोलिस संरक्षणात मार्गस्थ करण्यात आल्या. एकूणच पिंगुळी, वेताळबांबर्डे, साळगाव, माणगाव आदी भागात ठिकठिकाणी टायर व झाडे तोडून मार्ग रोखण्यात आले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मार्ग मोकळे करून मार्ग खुले केले. या आंदोलनादरम्यान कुडाळ आगाराच्या हिर्लोक व कुसगाव गावात वस्तीला गेलेल्या चार गाड्यांवर आंदोलकांनी दगडफेक केली. ठिकठिकाणी ग्रामीण भागातील रस्त्यांवर झाडे तोडून टाकल्यामुळे घोडगे, पांग्रड, वसोली, फुटब्रीज, वायंगवडे, मसुरे, आचरा, मालवण व कासारखिंड या  गाड्या उशिरापर्यंत अडकून पडल्या. परिणामी कुडाळ आगाराने आपल्या सर्व फेर्‍या दिवसभर बंद ठेवल्या होत्या. शहरातील व्यापारांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने  शहराने काहीसा मोकळा श्‍वास घेतला. आंदोलकांनी राज हॉटेल जवळ महामार्गावर काही वेळ ठिय्या मारला होता. या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

माणगाव खोर्‍यातील शिवापूरकडे जाणार्‍या मार्गावर जेसीबीच्या सहाय्याने ठिकठिकाणी झाडे पाडून आडवी केल्याने  आंबेरी येथे  50  वाहने  अडकून पडली होती. त्यामध्ये चार एसटीच्या गाड्यांचा समावेश होता. गुरुवारी दुपारी आंदोलकांनी दुकानवाड ते निळेलीपर्यंत रॅली काढली. माणगाव तिठ्यावर आंदोलनकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. माणगांव खोर्‍यातील व्यापार्‍यांनी बंद आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.  आंदोलनामुळे येथील अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या. सायंकाळी उशिरापर्यंत हा मार्ग खुला न झाल्याने वाहतूक पूर्ववत झाली नव्हती.