Thu, Jul 18, 2019 00:55होमपेज › Konkan › चार दुकाने फोडली

चार दुकाने फोडली

Published On: Jan 17 2018 1:58AM | Last Updated: Jan 16 2018 9:45PM

बुकमार्क करा
कुडाळ : शहर वार्ताहर

शहराच्या मुख्य बाजारपेठेतील चार दुकाने अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री फोडली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये खळबळ उडाली.  या चोर्‍यांमध्ये चारही दुकानातील मिळून रोख रकमेसह सुमारे दोन लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांची ही करामत  सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मोक्याच्या ठिकाणची दुकाने सराईतपणे फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले  आहे.

शहरातील गांधी चौकपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या जालमसिंह पुरोहित यांच्या श्री रेणुका स्वीट मार्टसह पांडुरंग धडाम यांचे स्वरूपानंद ट्रेडर्स, मनोहर कामत यांचे कुडाळ मेडिकल व मनीष कुडपकर यांचा मनीष फोटो स्टुडिओ अशी चार दुकाने सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली. रेणुका स्वीट मार्टची ग्रीलची खिडकी धारदार हत्याराने तोडत आत प्रवेश केला. या बेकरीतील चोरी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे या बेकरीच्या माळ्यावर बेकरीतील कामगार झोपले असताना चोरट्यांनी ही चोरी केली.

जिल्ह्यात पुन्हा  एका चोरीचे सत्र सुरू झाले आहे. कुडाळात मुख्य ठिकाणी चोरी झाल्याने चोरटे सराईत असल्याचे स्पष्ट होत आहे. या चोरट्यांच्या मुसक्या वेळीच आवळणे पोलिस प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.  अन्य तीन दुकानांच्या शटरचे कुलुप जवळील अँगल एकसारखे कापून चोरी केली. 

यात बेकरीतील 30 हजार रू. चा लॅपटॉप, 10 हजार रू.चे काजुगर व 40 हजार रू. रोख रक्‍कम, कुडाळ मेडिकल मधील सुमारे 8 हजार रू.चे बॉडी स्प्रे व काही रोख रक्‍कम, मनिष फोटो स्टुडिओतील प्रत्येकी 50 हजार रू. किंमतीचे दोन कॅमेरे, असा सुमारे दोन लाख रूपयापेक्षा अधिक मुद्देमाल व रोख रक्‍कम लंपास केला. मात्र धडाम यांच्या दुकानात चोरट्यांचा प्रयत्न फसल्याने त्यांच्या हाती काहीच लागू शकले नाही.

सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्याने चेहरा व अंगावर पांढरा कपडा बांधला आहे. त्याचा बांधा सडपातळ असून पायात शूज घातल्याचे दिसत आहेत. या परिसरात रात्रौच्या वेळी लाईटस् सुरू असतात. तसेच गांधी चौक येथे पोलिसांची गस्त असते. दुकानांजवळ व्यापार्‍यांची घरेही आहेत. तरीही चोरट्यांनी हे  धाडस केल्याने कुडाळ पोलिसांसमोर आव्हान उभे केले 
आहे.

या चोर्‍यांची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिस निरीक्षक अविनाश  भोसले, उपनिरीक्षक  लक्ष्मण गवस, पोलिस सायमन डिसोजा, हनुमंत धोत्रे, प्रशांंत कासार, आर.डी. राठोड, सुनील सावंत आदींनी धाव घेतली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी विश्‍वजीत काईंगडे यांनी भेट दिली. श्री. पोटभोडे व संतोष सावंत यांनी ठसे घेतले. श्‍वानपथकाला पाचारण  करून शोध घेण्यात आला. श्‍वान स्टॅण्ड परिसरात घुटमळला. श्री. पुरोहीत यांनी कुडाळ पोलिसात खबर दिली असून अधिक तपास कुडाळ पोलिस करीत 
आहेत.