Wed, Jul 17, 2019 18:57होमपेज › Konkan › चोरट्यांचा कुडाळात धुमाकूळ!

चोरट्यांचा कुडाळात धुमाकूळ!

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 10:20PMकुडाळ : शहर वार्ताहर

मालवण, बांदापाठोपाठ चोरट्यांनी कुडाळ शहराकडे मोर्चा वळवत सोमवारी रात्री भर बाजारपेठेतील फोटो स्टुडिओ व ब्युटीपार्लर अशी दोन दुकाने फोडली. चोरट्यांच्या या धुडगुसामुळे शहरात खळबळ उडाली आहे. यात कॅमेर्‍यांसह  सुमारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. जिल्ह्यात चोरीच्या  घटनांमध्ये वाढ होत असून,  चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान सिंधुदुर्ग पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.

मालवणात आठवडाभरापूर्वी फोटो स्टुडिओ, तर दोनच दिवसांपूर्वी बांद्यात फोटो स्टुडिओे चोरट्यांनी  फोडल्याची घटना ताजी असतानाच  कुडाळ बाजारपेठेतही चोरीची घटना उघडकीस आली. कुडाळ बाजारपेठेत वस्ती आहे. शिवाय, रात्रभर लाईटस् सुरू असतात. पोलिस पेट्रोलिंग  सुरू असते, या सर्वांना आव्हान देत चोरट्यांनी श्री मारुती प्रसाद कॉम्प्लेक्समधील त्रिमूर्ती फोटो स्टुडिओ, तर बसस्थानक परिसरातील शिरसाट बिल्डिंगमधील आदर्शनी ब्युटीपार्लर फोडले. मंगळवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. फोटो स्टुडिओच्या खिडकीची जाळी तोडण्याचा प्रयत्न असफल ठरल्याने चोरट्यांनी शटरच्या कुलपाजवळील पट्टी कापून आत प्रवेश केला. आतील साहित्य  विस्कटत लॉकर तोडले. यात दोन डिजिटल कॅमेरे व दोन जुने रोल कॅमेरे, अडीच हजार रू. रोख रक्‍कम  असा सुमारे दीड लाख रू.हून  अधिक मुद्देमाल लंपास केला. सकाळी 9 वा. या स्टुडिओत कामास असलेली मुलगी येताच तिच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने मालक सौ. शिवानी दत्तात्रय देशमुख यांना कळविले. लागलीच शिवानी देशमुख व त्यांचा मुलगा सनी देशमुख यांनी स्टुडिओत धाव घेत कुडाळ पोलिसांना माहिती दिली.

शहरातील दीपा देवेंद्र परब यांच्या ब्युटीपार्लरच्या दरवाजाचे कुलूप तोडून  चोरट्यांनी आतील चार मशीन्स, कॉस्मेटीक साहित्य व दीड हजार रू. रोख रक्‍कम असा एकूण 14 ते 15 हजार रू. चा मुद्देमाल लंपास केला. याबाबत सौ. परब यांनी कुडाळ पोलिसांत खबर दिली. पोहेकॉ. पी.जी. मोरे व श्री. किनळेकर यांनी घटनास्थळी जात पंचनामा  केला. श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.