होमपेज › Konkan › स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; आज मतमोजणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक; आज मतमोजणी

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 10:23PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

विधान परिषदेच्या रत्नागिरी-रायगड-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, उमेदवार अनिकेत तटकरे रत्नागिरीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीला 550 ते 575 मते मिळतील, असा विश्‍वास वाटत आहे. त्याचवेळी शिवसेना स्वत:ची 293 मते शाबूत राहतील, असे सांगत असल्याने त्यांनी विजयाची आशा सोडल्यात जमा आहे. पालघरमध्ये शिवसेना, भाजपचे मतभेद वाढल्याचे हे परिणाम असल्याचेही मानले जात आहे.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 21 मे रोजी मतदान झाले. गुरुवारी सकाळी 8 वा. पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्पबचत हॉलमध्ये ही मतमोजणी होणार आहे.  या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजीव साबळे आणि राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांच्यात सरळ लढत झाली आहे. पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना भाजपमधील वितुष्टाचा या निवडणुकीवर परिणाम झाला आहे. भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेत प्रवेश देऊन उमेदवारी दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने त्याचा अप्रत्यक्षरित्या सूड घेतला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी युती अभेद्य ठेवण्याबाबत कोणतीही जाहीर आणि ठाम भूमिका घेतली नाही. याचा राजकीय लाभ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अलगद उचलला.

जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरसेवक या निवडणुकीतील मतदार आहेत. शिवसेना वगळता इतर सर्व पक्षीय मतदार राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे शिवसेना एकाकी राहिल्याचे शिवसेना नेत्यांकडूनच सांगितले जात आहे. त्यात ज्या शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर या निवडणुकीची जबाबदारी होती, त्यांनी भाजपच्या सदस्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी अपेक्षित प्रयत्न केले नाहीत, असेही बोलले जात आहे. आयत्यावेळी त्यांना संपर्क साधला जात होता. त्यावेळी मात्र ते नॉट रिचेबल होते.

निवडणुकीदरम्यान झालेल्या या राजकारणाचा फार मोठा परिणाम झाला आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते आ. सुनील तटकरे यांचा लोकसंपर्क आणि स्नेह दांडगा असल्यानेही इतर पक्षीय मतदारांची साथही त्यांनाच मिळाली. त्यामुळे आम्ही पक्षाची मते एकसंघ ठेवण्यात यशस्वी झालो असल्याचे सांगून अप्रत्यक्षरित्या मतमोजणीनंतर काय होणार, याचा प्रत्यय आणून देत आहेत. दरम्यान, एकूण 938 मतदारांपैकी 550 ते 575 मते मिळतील, असा विश्‍वास राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत आहे.

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदारांचे बलाबल पाहिले तर ते शिवसेनेचे मोठे आहे. तब्बल 293 मतदार शिवसेनेकडे आहेत. तरीही विजयाचा ठाम विश्‍वास व्यक्‍त केला जात नाही. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादीकडे 174 मतदार आहेत. उर्वरित पक्षीय मतदारांमध्ये काँग्रेसचे 69, भाजपचे 164, मनसेचे 12, स्वाभिमानचे 98, शेकापचे 92, अपक्ष 37 मतदार आहेत. यातील बहुतांश मतदारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत राहण्याचे पसंत केल्यानेच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्‍चित मानला जात आहे.

दरम्यान, गुरूवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रथम तिन्ही जिल्ह्यातील मतपत्रिका एकत्र केल्या जातील. त्यानंतर त्याचे 25-25चे गठ्ठे केल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होणार आहे. त्यामुळे अवघ्या दोन-अडीच तासांत कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा आमदार कोण हे स्पष्ट होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर कडक पोलिस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, निकालाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, उमेदवार अनिकेत तटकरेंसह राष्ट्रवादीची नेतेे मंडळी बुधवारीच रत्नागिरीत दाखल झाली आहेत.