Thu, Dec 12, 2019 09:48होमपेज › Konkan › समाजसुधारक समतानंद गद्रे यांचे देवरूखात होणार स्मारक 

समाजसुधारक समतानंद गद्रे यांचे देवरूखात होणार स्मारक 

Published On: Jun 14 2019 1:54AM | Last Updated: Jun 13 2019 9:34PM
देवरुख  : प्रतिनिधी

देवरुखचे सुपुत्र आणि थोर समाजसुधारक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांच्या कार्यावर चरित्र लिहिले जात आहे. देवरुख येथे त्यांचे स्मारक उभे रहावे, यासाठी शहरवासियांनी पुढाकार घेतला आहे.सुप्रसिद्घ लेखक भानु काळे यांनी समतानंदांचे चरित्र लिहिण्याची जबाबदारी घेतली आहे.

समतानंद तथा अनंत हरी गद्रे यांची पत्रकारिता, नाट्यलेखक म्हणून केलेले कार्य, नाटीका संप्रदायाची कारकिर्द, जाहिरातीची कल्पकता, प्रचारासाठीचे नाट्यलेखन, समतेसाठी सुरु केलेली सत्यनारायणाची पूजा व प्रसाद म्हणून दिला जाणारी झुणका भाकर ही चळवळ याची मांडणी होणार आहे. आचार्य अत्रे, सोहराब मोदी,लोकमान्य टिळक,स्वातंत्र्यवीर सावरकर, बालगंधर्व यांच्याशी असलेले समतानंदांचे नाते व कार्य यामध्ये समाविष्ट असणार आहे. समतानंदांना मिळालेले पुरस्कार,नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद व अस्पृश्यांसाठी केलेले कार्य असा लेखाजोगा असणार आहे. समतानंदांचे दुर्लक्षित राहिलेले कार्य या पुस्तकरुपाने लोकांसमोर येणार आहे. देवरुख येथे त्यांचे स्मारक उभे रहावे, यासाठी शहरवासियांनी पुढाकार घेतला आहे.

समतानंदांविषयी अधिक माहिती कुणाकडे उपलब्ध असेल तर ज्योती अवसरे- मुळ्ये व योगेश हळदवणेकर यांच्याकडे रत्नागिरीत व युयुत्सु आर्ते, प्रमोद हर्डीकर यांच्याशी देवरूखात संपर्क साधावा, असे आवाहन समितीने केले आहे. देवरूखात समतानंदांचे स्मारक उभारण्याविषयी शहरवासीयांनी पुढकिार घेतला असून अल्पावधीत ते उभारले जाईल, असे आर्ते यांनी सांगितले.