Mon, Jul 22, 2019 13:12होमपेज › Konkan › राज्याचा शैक्षणिक चेहरा प्रगत होतोय

राज्याचा शैक्षणिक चेहरा प्रगत होतोय

Published On: Jan 12 2018 1:53AM | Last Updated: Jan 11 2018 11:17PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

कमी पटसंख्येच्या शाळांचे अन्य शाळेत वर्गीकरण, कंपनी शाळा, शाळा बाह्य कामे अशा प्रकारच्या निर्णयातील 80 टक्के वास्तव संबंधितांपर्यंत पोहोचले नाही. परंतु, भाजप सरकारच्या निर्णयांमुळे गेल्या तीन वर्षांत देशात राज्याची गुणवत्ता 16 व्या क्रमांकावरून तिसर्‍या क्रमांकावर आली आहे. यामुळे राज्याचा शैक्षणिक चेहरा प्रगत होतोय, असे प्रतिपादन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले. 

प्राथमिक, माध्यमिक आणि ‘डाएट’ परिवारातर्फे रत्नागिरी येथील  उद्यमनगर येथील एम. डी. नाईक हॉल येथे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘शिक्षणाची वारी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन ना. तावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र विद्या प्राधिकरणचे संचालक सुनील मगर, जि. प. अध्यक्षा स्नेहा सावंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, शिक्षण सभापती दीपक नागले, गंगाधर म्हमाणे, दिनकर पाटील, शिरगावच्या सरपंच वैशाली गावडे आदी उपस्थित होते.

दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ना. तावडे म्हणाले, कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा, क्रीडा स्पर्धा, सहल आदी उपक्रम होत नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांसह नजीकच्या जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये वर्ग केल्यास त्यांची गुणवत्ता वाढेल. यामध्ये प्राथमिक शाळांसाठी 1 किमीचा तर माध्यमिक शाळांसाठी 3 किमीचा निकष आहे. कोकणातील दुर्गम भागात शाळा असल्यामुळे यातील निकषात बदल करण्यात येईल. यातील अंतरामध्ये त्रुटी आढळल्यास फेरसर्वेक्षण करण्यात येईल.

एखाद्या कंपनीला सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शाळा सुरू करायची असेल तर शासन त्यांना अनुदान देत नाही. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर ती शाळा स्वयंअर्थसहाय्यित शाळा काढू शकते. शाळाबाह्य कामे मागील 20 वर्षे सुरू आहेत. मग गेल्या 3 वर्षांतच त्याची ओरड का होत आहे? असा संतप्त सवाल ना. तावडे यांनी केला. शिक्षकांची शाळाबाह्य कामे कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावले उचलली आहेत. शिक्षकांना शाळेत राहू द्या, असा आग्रह त्यांनी धरला आहे.

शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हा बदल्यांमुळे या प्रक्रियेत पारदर्शकता आली. यामुळे बदलीची प्रक्रिया सुलभ झाली आहे. विविध चाचण्या, शिष्यवृत्ती, परीक्षा आणि अन्य कारणांमुळे विद्यार्थ्यांची माहिती वेळोवेळी ऑनलाईन भरावी लागते. यात शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा वेळ जातो. मात्र, ‘सरल’ प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात येऊन ऑनलाईन फॉर्म भरताना ती उपयुक्‍त ठरत आहे. यामुळे ऑनलाईनची कामे कमी झाली आहेत, असेही तावडे म्हणाले.

... तर रत्नागिरीत नाट्य महोत्सव 
 

रत्नागिरी येथे शिक्षण विभागातर्फे आयोजित ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र रत्नागिरीतून कोल्हापूरला हलविल्याबाबत प्रश्‍न विचारला. यावर ते म्हणाले की, रत्नागिरीत नाट्य चळवळ चांगली रुजत आहे. येथे अनेक नाट्य स्पर्धा होत आहेत. संगीत राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र कोल्हापूरला हलविण्यात आले आहे. याबाबत आपण दोन्ही केंद्रांवरच्या नाट्यकर्मींची एक बैठक लवकरच आयोजित करू. यामध्ये या स्पर्धा रत्नागिरीत व्हाव्यात हा मुद्दा प्रकर्षाने मांडू. जर यावर तोडगा निघाला तर ठीक अन्यथा रत्नागिरीत नाट्य महोत्सव आयोजित करून या राज्य नाट्य स्पर्धेतील निवडक 10 नाटकांचे सादरीकरण येथे करू, असे आश्‍वासन ना. तावडे यांनी दिले.

गेल्यावर्षी रत्नागिरीतील संगीत नाटक प्रथम येऊनसुद्धा रत्नागिरी हे केंद्र कोल्हापूरला हलविण्याचा घाट घातला गेला आहे. नाट्य  स्पर्धेचे केंद्र रत्नागिरीतच रहावे, यासाठी नाट्यकर्मींनीही याबाबत ना. तावडे यांच्याकडे नाराजी व्यक्‍त  केली.