Sun, Mar 24, 2019 08:14होमपेज › Konkan › वेंगुर्ले कॅम्प येथे होणार अत्याधुनिक मत्स्यालय

वेंगुर्ले कॅम्प येथे होणार अत्याधुनिक मत्स्यालय

Published On: Aug 07 2018 1:00AM | Last Updated: Aug 06 2018 10:45PMवेंगुर्ले : शहर वार्ताहर

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कॅम्प येथील म्युनिसिपल रेस्ट हाऊससाठी आरक्षित असलेल्या जागेत अत्याधुनिक मत्स्यालय केंद्र बांधकामासाठी निधी प्राप्त होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा ठराव न.  प. च्या सर्वसाधारण सभेत  करण्यात आला. 

वेंगुर्ले न. प. कौन्सिलची सर्वसाधारण सभा सोमवारी  सांस्कृतिक सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी वैभव साबळे, अधीक्षक सुरेल परब व सर्व  नगरसेवक  उपस्थित होते.

बैठकीत शहरातील गाळेधारकांसंदर्भात चर्चा करण्यात आली.सर्व नगरसेवकानी गाळेधारकांना गाळ्याचा ताबा घेण्यासाठी मंगळवार सायंकाळ पर्यंत मुदत मागितली. नगराध्यक्ष व  मुख्याधिकार्‍यांनी  ही मागणी मान्य केली. वेंगुर्ले बंदर रस्त्याच्या तुटलेल्या कठाड्यांबाबत चर्चा करण्यात आली. पर्यटनाच्या दृष्टीने  हॉटेल सागर सरिता ते मांडवी खाडी ते बंदर या रस्त्यावर पर्यटकांना बसण्यासाठी  पायर्‍या बांधण्याचा ठराव करण्यात आला. यासाठी 100 मीटर अंतराचा अंदाजे खर्च 79 लाख असून टप्प्या टप्प्याने या पायर्‍याचे काम पूर्ण केले जाईल. या निधीसाठी  राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रस्ताव तयार करा आपण निधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. असे नगराध्यक्षांनी सांगितले.  या प्रस्तावास न. प. च्या सर्व नगरसेवकांच्या सर्वानुमते संमत्ती देण्यात आली. 

पर्यटनाच्या दृष्टीने वेंगुर्ले येथे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी साधारणतः दोन एकर जागेची आवश्यकता आहे. वेंगुर्ले कॅम्प येथे सध्या 48 गुंठे जागा उपलब्ध आहे. त्यामुळे अजून थोडी जागा उपलब्ध झाली तर कॅम्प येथे तारापूरसारखे भव्य मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. यासाठी अपेक्षित खर्च  30 कोटी असून तो  केंद्र सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मत्स्यालय प्रकल्पास सर्वानुमते अनुमती देण्यात आली. शहरातील वृक्षगणना जीपीएसद्वारा करण्यात येणार आहे. त्यासाठी ठराव करण्यात आला.  आनंदवाडी स्मशानभूमी व समाज मंदिराचे रंगकाम करणे, व्यायामशाळा किंवा वाचनालय उभारणे. तसेच तेथील गटाराचे बांधकाम, डॉ.वनकुद्रे घराकडे जाणार्‍या रस्त्याचे काम आदी कामांना  मंजुरी देण्यात आली. कृतिका कुबल यांनी वेंगुर्लेकर वस्तीत सोडण्यात येणार्‍या सांडपाण्यासंदर्भात प्रश्‍न उपस्थित केला व तात्काळ व्यवस्था करण्याची मागणी केली. शीतल आंगचेकर यांनी वडखोल परिसरातील वीज लाईनवरील झाडे तात्काळ तोडण्याची मागणी केली. संदेश निकम यांनी शहरात डास प्रतिबंधक फवारणीची व गणपती विसर्जन   ठिकाणची वाढलेली झाडीझुडुपे तोडण्याची सूचना केली. वेंगा बॉईस यांच्यातर्फे आयोजित 19  तारीखला होणार्‍या सायकल रॅलीच्या वेळी नगराध्यक्ष,सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांनी शहरातून जाणार्‍या या रॅलीमध्ये उपस्थित राहण्याचे ठरले. नॅशनल हॉलीबॉल स्पर्धा होऊ घातली असून या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत. यासाठी 3 लाख 50 हजार खर्च अपेक्षित असून 1 लाख रुपये हे केंद्रामार्फत करण्यात येणार आहेत. उर्वरित 2 लाख 50 हजार खर्च न. प. मार्फत होणार आहे.  या स्पर्धेचे यजमान म्हणून वेंगुर्ले न. प. ची निवड करण्यात आली असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.