Fri, Jan 24, 2020 21:52होमपेज › Konkan › राजकीय आडाखे बांधण्यास सुरुवात

राजकीय आडाखे बांधण्यास सुरुवात

Published On: Apr 30 2019 1:56AM | Last Updated: Apr 30 2019 1:56AM
लांजा : जगदीश कदम

लोकसभा निवडणुकीत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघात कोणाला मताधिक्य प्राप्त होईल यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये युती आणि आघाडीतील घटक पक्षांचा मुख्य व्होरा कुठे आहे यावरुनच निकालाचे राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत. या मतदारसंघात कोण किती मताधिक्य घेईल, याचे आडाखेही बांधले जात आहे.

या निवडणुकीत राजापूर-लांजा विधानसभा क्षेत्रातील भाजप, राष्ट्रवादी या घटक पक्षांची भूमिका संदिग्ध राहिली. काँग्रेसला यावेळी प्रचंड मरगळ आल्याचे प्रकर्षाने जाणवले. यातून काँग्रेस उमेदवारीबाबत सुरुवातीपासून नाराजी असलेल्या विचारप्रवाहाने आपला मदतीचा हात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वळचणीला दिल्याचे खात्रीपूर्वक स्पष्ट होत आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने स्वाभिमान पक्षाचे काम केले हे जगजाहीर आहे. विशेषतः अजित यशवंतराव यांची उघड भूमिका स्वाभिमानला या मतदारसंघात तारणारी ठरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील 2 लाख 37 हजार 845 मतदारांपैकी 1 लाख 38 हजार 166 मतदारांनी मतदान केले. 58.09 टक्के इतकी या मतदारसंघाची टक्केवारी राहिली. साठीदेखील न गाठलेल्या येथील मतदानाच्या कमी टक्केवारीचा फटका कोणाला बसेल, हे सांगता येत नाही.

राजापूर लांजा विधानसभा क्षेत्रात  शिवसेनेच्या एकहाती असलेल्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी आजवर अनेकदा प्रयत्न झाले. हे प्रयत्न सातत्याने निष्फळ होत आले. मात्र केवळ नारायण राणे यांच्या तत्कालीन काँग्रेस प्रवेशानंतर सेनेच्या येथील वर्चस्वाला हादरा बसला होता. 2009 ला नारायण राणेंमुळेच लोकसभेच्या या जागेवर काँग्रेसचा विजय झाला. मात्र मोदी लाटेचा फटका 2014 ला बसून पुन्हा शिवसेनेने या मतदारसंघात कमबॅक केले.

मूलतः राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात सेना विरोधी काँग्रेस अशीच लढत आजवर बघायला मिळाली आहे. मात्र यावेळी शिवसेने समोर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आव्हान उभे ठाकले आहेे. अनेक वर्षांपासून या विधानसभा मतदारसंघात सत्तेत असणार्‍या शिवसेनेला विकासाच्या अनुशेषावरून  होणारा विरोध आणि निर्माण होणार्‍या स्वकीयांच्याच अंतर्गत कुरघोड्या अशा आव्हानांना सामोरे जावे लागले. याबरोबरच अजुनही लांजा राजापूर तालुक्यात शिवसेना-भाजपात तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच काहीसं वातावरण पूर्वापार आहे. युतीचा धर्म पाळण्याची वचने आणि घोषणा वरकरणी होत असताना खर्‍या दिलजमाईचा अभाव याठिकाणी होता हे निश्चित. तर भाजपचा युती न पटलेला एक गट स्वाभिमानच्या पथ्यावर पडणार असल्याचे चित्र बघावयास मिळत होते.  

काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांचा मतदार संघातील जनसंपर्काचा असलेला अभाव आणि काँग्रेसची प्रचारयंत्रणा पूर्णतः ढेपाळलेली  दिसून आली. यासह वंचित बहुजन आघाडीने काका जोशी यांची उमेदवारी युती आणि आघाडी समोर पेच निर्माण करणारी बनली होती. त्यामुळे दि. 23 मे ला ‘कौन कितने पानी मे’ हे कळणार आहे.

अजित यशवंतरावांचा ‘स्वाभिमान’ जागृत?

राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी म्हणून असलेली भूमिका संदिग्ध असल्याने राणेंसाठी राष्ट्रवादीचा अप्रत्यक्ष पाठिंबा महत्त्वाचा ठरणारा आहे. राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव यांनी पुढील विधानसभेच्यादृष्टीने आपला  सावध पवित्रा घेऊन काम केले. काँग्रेस प्रवेशासाठी ते आग्रही असताना त्यांना काँग्रेस अंतर्गत राजकारणाचा जोरदार विरोध झाला. यामुळे नाराज अजित यशवंतराव आघाडी उमेदवाराऐवजी स्वाभिमान पक्षाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.