होमपेज › Konkan › सर्वसामान्यांची ‘एसटी’ जगली पाहिजे

सर्वसामान्यांची ‘एसटी’ जगली पाहिजे

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:09PM

बुकमार्क करा
रत्नागिरी ः प्रतिनिधी

एसटी कामगारांची अवस्था गिरणी कामगारांपेक्षा बेकार झाली आहे. कमी पगारावर त्यांना काम करावे लागत आहे. त्यातच मंत्री आणि परिवहनच्याच अधिकार्‍यांचा खासगीकरणाकडे कल वाढत आहे. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली ‘एसटी’ जगली पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे अध्यक्ष हरी माळी यांनी केले. 

कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ते शनिवारी रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील साळवी, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजाराम करंजकर, कार्याध्यक्ष राजेश भाट्ये, सरचिटणीस रसिक कदम, कोषाध्यक्ष अमित खेडेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पगारवाढीसाठी केलेल्या संपाचे श्रेय कर्मचार्‍यांचेच आहे. कुठल्याही संघटनेने संपाचे श्रेय घेऊ नये. आपल्यावरील अन्यायाची कर्मचार्‍यांना जाणीव झाल्यानेच त्यांनी संप केला. कामगारांच्या हक्‍कांसाठी आपणही कामगार आयुक्‍त आणि कोर्टात जाऊ.

प्रत्येक एसटी स्थानकाबाहेर वडापच्या गाड्या दिसून येतात. याला परिवहन खाते, पोलिस आणि आरटीओ यांच्या संगनमताने अभय मिळत आहे. वडापवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. एसटीचे प्रवासी वडापवाले पळवत आहेत.एसटीला 125 कोटी रुपयांचा टोल भरावा लागत आहे. हा टोल माफ केल्यास कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्‍न निकाली लागू शकतो. तसेच निवडणूक आणि अन्य बाबींसाठी करण्यात आलेल्या वाहतुकीतून एसटीला सरकारकडून 2 हजार 500 कोटी येणे आहे, असे माळी म्हणाले.
कोकण दौर्‍यात आपण प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.