Sat, Jul 20, 2019 08:35होमपेज › Konkan › गिमवीत चार शिकारी जेरबंद

गिमवीत चार शिकारी जेरबंद

Published On: Aug 12 2018 10:30PM | Last Updated: Aug 12 2018 10:25PMशृंगारतळी : वार्ताहर

वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी गाडीतून फिरणार्‍या चौघांना गुहागर पोलिसांनी पकडले. या चौघांकडून डबल बॅरल बंदुकीसह जिवंत काडतुसे  जप्त करण्यात आली आहेत. शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

संतोष मधुकर निकम (रा. गिमवी, गुहागर), संदीप संजय मोहिते (रा. खडपोली, चिपळूण), अमोल चंद्रकांत मोडक (रा. कान्हे पिंपळी, चिपळूण), मंगेश सुरेश तांबे (रा. कान्हे, चिपळूण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

गुहागर-चिपळूण मार्गावरील गिमवी येथे शनिवारी रात्री एक मारुती गाडी पोलिसांना संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांनी या गाडीची तपासणी केली तेव्हा गाडीत डबल बॅरलची एक बंदूक व तीन जिवंत काडतुसे, बॅटरी आदी मुद्देमाल आढळून आला. यातील संतोष मधुकर निकम हा गिमवी येथील रहिवासी आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत. 

गुहागर तालुक्यामध्ये रात्रीच्यावेळी शिकार करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी गावठी बॉम्ब रानात ठेवून त्यानेही शिकार केली जाते. यामध्ये वन्यप्राण्यासह काही पाळीव जनावरेही मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे याबाबत ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. आता अटक करण्यात आलेल्यांपैकी तिघेजण हे चिपळूण तालुक्यातील आहेत. त्यामुळे गुहागर तालुक्यात होणार्‍या शिकारींमागे चिपळुणातील शिकारी असल्याचे उघड झाले आहे.