Sun, Aug 18, 2019 21:34होमपेज › Konkan › जीवरक्षक योजनेमुळे मिळणार रोजगार

जीवरक्षक योजनेमुळे मिळणार रोजगार

Published On: Mar 11 2018 10:44PM | Last Updated: Mar 11 2018 10:35PMशृंगारतळी : वार्ताहर

जिल्हा मेरिटाईम बोर्डाकडून गेले वर्षभर निर्मल सागरतट अभियान सुरू आहे. या माध्यमातून 26 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सागरी किनार्‍यांचा कायापालट झाला आहे. या मोहिमे अंतर्गत 25 टक्के निधी सागरी सुरक्षेसाठी राखून ठेवण्यात आला असून जि.प.च्या सूचनेनुसार किनार्‍यांवर प्रत्येक ग्रा. पं.च्या हद्दीतील प्रत्येकी दोन जीवरक्षकांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती मेरिटाईम बोर्डातर्फे देण्यात आली आहे.

कोकणात पयर्र्टकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे सागरी किनार्‍यांवर सुविधांचा अभाव होता. अगदी गणेशगुळे बीचपासून कोळथरे बीचपर्यंत पर्यटकांची गर्दी असते. हा पर्यटनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच स्वच्छ आणि सुंदर किनारा ठेवण्यासाठी राज्याच्या मेरिटाईम बोर्डाने ‘निर्मल सागर तट अभियान’ हाती घेतले आहे. यासाठी 50 लाखांचे पहिले पारितोषिकही जाहीर केले आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी मेरिटाईमने 100 टक्के निधी 26 ग्रा.पं.ना पुरविला आहे. 

यामध्ये स्वच्छता, चेंजिग रूम, स्वच्छतागृहालय, पार्किंग, एलईडी लाईटस्, पर्यटक बेंचेस, उद्यान, ओपन जिम आदींसह विविध उपक्रम या निधीतून राबवायचे आहेत. या निधीचा वापर करून आदर्श सुविधा निर्माण करणार्‍या  गावाला गौरविण्यात येणार आहे. यातील 25 टक्के निधी हा सागरी सुरक्षेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. समुद्रकिनारी पर्यटकांबाबत घडणार्‍या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर जि.प. ने ग्रा.पं.ना प्रत्येक समुद्रकिनारी दोन जीवरक्षक नेमण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, निधीअभावी त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आता मेरिटाईमकडील निधीतून जीवरक्षकांची नेमणूक होणार आहे. 

या योजनेतून गावातीलच दोन तरूणांना रोजगार मिळणार आहे. गावातूनच निवडलेल्या दोन जीवरक्षकांना गोवा येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या नंतर त्यांची नेमणूक त्यांच्या गावातील सागरी किनार्‍यावर केली जाणार आहे.