Tue, Jul 16, 2019 09:36होमपेज › Konkan › सावंतवाडीचे प्रसिद्ध श्रीदेव पाटेकर मंदिर 

सावंतवाडीचे प्रसिद्ध श्रीदेव पाटेकर मंदिर 

Published On: Sep 05 2018 8:10AM | Last Updated: Sep 05 2018 8:10AMसावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग): हरिश्चंद्र पवार

सावंतवाडी शहरातील संस्थानकालीन साडेतीनशे वर्षाहून अधिक पुरातन अशा श्रीदेव पाटेकर मंदिरामध्ये शिवभक्तांची नेहमीच मोठी रीघ असते. सावंतवाडी संस्थानच्या प्रजाजनांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव पाटेकर या देवतेची स्थापना  ३९० वर्षांपूर्वी झाले आहे. शिवशंकराचा साक्षात्कार खेमराज सावंत नामक गुराख्याला झाला आणि त्याला परशुराम भारती नावाचे योगीपुरुष भेटले आणि तेथूनच हा गुराखी म्हणजे सावंतवाडी संस्थानचा पहिला राजा महाराजा म्हणून ओळखू लागला, अशी आख्यायिका सांगितली जाते. 

खेम सावंतांना पंचमुखी भुजंगनाथाने साक्षात्कार दिला तो सध्य स्थितीत असलेल्या श्री देव पाटेकर मंदिराच्या ठिकाणी पाटावर येऊन बसत असे. या पाटा समोर हा गुराखी शिव शंकराची भक्ती करून ध्यानधारणा करत असे. नागराज पाटावर बसल्याने त्या पाटाला पाटेकर हे नाव प्राप्त झाले अशी आख्यायिका आहे. 

भुजंगनाथ हे शंकराचे रूप असून, सावंतवाडी संस्थानांमध्ये ओटवणे या गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण ओटवणे, गावाच्या नदीकिनारी  खेम सावंत नामक ह्या गुराख्याला सर्वप्रथम साक्षात्कार झाला. तो ध्यानधारणा करत असताना झालेल्या या साक्षात्कारानंतर त्याने सावंतवाडी शहरातील पाटेकर मंदिरासमोर ध्यानधारणा सुरू केली होती. 

सावंत सावंतवाडी संस्थानचे पहिले खेम हे याच श्री देव पाटेकर समोर शिवशंकराला नतमस्तक झाले होते. तब्बल पाच राजघराण्यांच्या गाद्यांच्या परंपरेमध्ये संस्थांनचे योगीपुरुष म्हणून परशुराम भारती हे तळवणे येथील राजगुरू होते. त्यानंतर बापूसाहेब महाराज हे गादीवर विराजमान झाले. त्यानी केलेला राज्यकारभार सर्वांनाच ज्ञात आहे. रामराजा म्हणून त्यांनी सावंतवाडी संस्थानचा कारभार पाहिला. यामध्ये दाणोली येथील परमपूज्य सद्गुरु साटम महाराज हे त्यांना राजगुरू म्हणून लाभले. सावंतवाडी संस्थानची आणि श्री देव पाटेकरची सीमा नेमकी कुठे आहे, याची आखणी दुसरे खेमसावंत भोसले यांनी  केली. यामध्ये कलशाच्या रूपाच्या आकाराची  सीमा होती. कुडाळ, बांदा, वेंगुर्ले ,फुकेरी, साखळी, डिचोली आणि पेडणे गोवा या गावातील  सीमा बांधून घेतली. त्यामुळे श्री देव पाटेकर यांच्या भक्तांची व्याप्ती ही केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्या पुरतीच नव्हे तर गोवा राज्यापर्यंतही पोहोचलेली आहे.

श्री देव  पाटेकरांच्या पूजनाचे व सर्व धार्मिक कामे  सावंतवाडी शहरातील भटवाडी येथील पौराहित्य कोळंबेकर कुटुंबीयांकडून केले जाते. 

श्री देव  पाटेकर हे श्री शिव आणि श्री विष्णू  यांचे एकत्रीत रूप 

श्री पाटेकर मंदिर हे सुमारे १६९६ पासून सुरु असावे, मंदिराची स्थापना सोळाशे ९४ साली झाली असावी असे राजपुरोहित कोळंबेकर यांचे म्हणणे आहे. श्री देव  पाटेकर हे श्री शिव आणि श्री विष्णू  यांचे एकत्रीत रूप असून, सावंतवाडी संस्थानच्या भोसले सावंत घराण्याचे कुलदैवत  आहे. सावंतवाडी संस्थानच्या इतिहासामध्ये शहरातील माठेवाडा येथील देव आत्मेश्वर मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तत्कालीन सावंतवाडी संस्थानचे राजगुरू दामोदर भारती महाराज यांनी त्रिशूल मारून गंगा निर्माण केली. ही गंगा म्हणजे  माठेवाडा येथील श्रीदेव आत्मेश्वर. मंदिरासमोर अष्टो प्रहरी  पाण्याने भरलेले तळी आहेत.

कसे जाल 

सावंतवाडी येथील प्रसिद्ध श्रीदेव पाटेकर मंदिरांमध्ये जाण्यासाठी सावंतवाडी शहरात एसटी बस स्थानकावरून दहा मिनिटात पायी चालत मंदिरापर्यंत जाता येते. सावंतवाडी संस्थानच्या राज राजवाड्याचे प्रवेशद्वार  लेस्टर गेटपासून डावीकडे वळल्या नंतर श्री पाटेकरांचे मंदिर आहे. चिरेबंदी घरासारखे दिसणाऱ्या मंदिरामध्ये प्रवेश करताना  पायर्‍या चढून जावे लागते. पुढे उजवीकडे वळल्‍या नंतर श्री देव पाटेकरांचा चौथरा व पुढे पाटा दिसतो. या पाट्याचे दर्शन घेऊन भक्तगण कृतकृत्य होतात. श्रीदेव पाटेकर यांच्या मंदिराकडे येण्यासाठी गोवा राज्याची पणजी या राजधानीतून सुमारे सत्तर किलोमीटरचे अंतर आहे तर बेळगाव पासून ९० ते १०० किलोमीटर, कोल्हापूर येथून ११० किलोमीटर तर रत्नागिरी जिल्ह्यातून येथे येण्यासाठी ११० किलोमीटरचे अंतर आहे