Sun, May 26, 2019 10:58होमपेज › Konkan › संगमेश्‍वर तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण

संगमेश्‍वर तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण

Published On: Jan 31 2018 10:55PM | Last Updated: Jan 31 2018 10:42PMदेवरुख : प्रतिनिधी

शासन धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात क्रीडासंकुल या योजनेतील रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले क्रीडासंकुल उभारण्याचा मान प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाला मिळाला आहे. यासाठी लागणारी 10 एकर जमिन कोसुंबच्या पवार बंधुनी दान म्हणून दिली आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, तर यात रवींद्र मानेंचा दूरदृष्टीपणा आहे, असा गौरव करुन या संकुलातील खेळाडूंसाठी शासनाकडून आपण सुविधा पुरवू, असे मत पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी व्यक्त केले. यावेळी क्रीडा संकुलाचे लोकार्पण ना. वायकर यांच्याहस्ते करण्यात आले. 

साडवली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या उद्घटनप्रसंगी ना. वायकर बोलत होते. यावेळी प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माने, कार्याध्यक्षा नेहा माने, आ. सदानंंद चव्हाण, माजी आ. सुभाष बने, तहसीलदार संदीप कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात मिलिंद दिक्षित यांनी  तालुका क्रीडा  संकुलासाठी प्रथम 97 साली पाच लाख, नंतर पन्नास लाख व अखेरीस एक कोटी रुपयाचे अनुदान प्राप्त झाल्याचे सांगितले. भविष्यात हा निधी वाढेल, असे सांगून खेळाडूंसाठी महिना फी बसवावी लागणार असल्याचे स्पष्ट केले.

माजी आमदार सुभाष बने यांनी रवींद्र माने यांची दूरदृष्टी चांगली असल्यानेच शैक्षणिक चळवळी नंतर आता हे तालुका क्रीडासंकुल खेळाडुंसाठी वरदान ठरणार आहे.खेळाडूंनी याचा फायदा करुन घ्यावा,असे आवाहन केले. आ. सदानंद चव्हाण यांनी तालुका क्रीडा संकुलात चांगले क्रीडापटू तयार होतील, असा विश्‍वास व्यक्त केला.

रविंद्र माने यांनी पवार बंधुनी जागा देवून मोठे योगदान दिले म्हणुनच या जागेत हे क्रीडासंकुल उभे राहिले आहे. त्यांची भावना महत्वाची आहे.पवारांची प्रेरणा घेवून मीही माजी सैनिकांसाठी जागा दिली आहे. आंबव येथील इंजिनिअरींग कॉलेजच्या माध्यमातून अनेक गरीब मुलांना आपण मोफत शिक्षण देवून इंजिनिअर केले आहे. हीच भावना जोपासून या क्रीडा संकुलातून चांगले खेळाडू घडवण्याचे माझे व्हिजन आहे.

पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी उद्घाटक या नात्याने बोलताना कोकणातील विद्यार्थी हुशार आहेत. बोर्डात कोकण अव्वल आहे. हा जिल्हा नररत्नांची खाण आहे. या क्रीडा संकुलातून चांगले खेळाडू घडण्यासाठी इथे चांगले प्रशिक्षक नेमावेत, असे आवाहन केले. चांगल्या खेळाडूंसाठी आपण शासन पातळीवरुन जरुर निधी देवू, असे ठामपणे सांगितले.शिवसेनेने आपल्याला समाजसेवेची चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे. बाळासाहेबांना अभिप्रेत कार्य घडत असल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. ना.वायकर यांनी 10 एकर जमिन दान देणारे कोसुंबचे पवार बंधु यांचा शाल, श्रीफळ देवून खास सन्मान केला.आजच्या घडीला एक इंच जागा कोण सोडत नाही यांनी तर दहा एकर जागा दिली आहे,हे खरोखरच हा मोठा त्याग आहे अशा शब्दात पवारांचा गौरव केला.