राजापूर : प्रतिनिधी
नाणारचा रणसंग्राम चांगलाच पेटलेला असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या कोकण दौर्यात गुरुवार दि. 24 मे रोजी प्रकल्पग्रस्तांची राजापुरात भेट घेणार आहेत. या पूर्वी मनसे अध्यक्षांनी प्रकल्प परिसराचा दौरा करताना प्रकल्प विरोधकांना भक्कम पाठिंबा दिला होता. गुरुवारच्या बैठकीत राज ठाकरे प्रकल्पाबाबत नव्याने काय बोलतात, याकडे सार्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मनसेने रिफायनरी प्रकल्पाविरुध्द जोरदार रणशिंग फुंकले आहे. निसर्गरम्य कोकणावर विनाशकारी प्रकल्प लादणार्या शासनाचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला होता तर ताडदेव, मुंबईतील रिफायनरीचे कार्यालय मनसैनिकांनी फोडले होते. एवढे होवूनही जर शासनाने हा प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केलाच तर राज्यभरात आंदोलनाचे इशारे मनसेकडून देण्यात आले होते.
मनसे रिफायनरीच्या विरोधात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौर्यातील पुढील टप्प्याची कोकणातून सुरवात होत आहे. गुरुवार दि. 24 मे रोजी ते राजापुरात येत आहेत. त्या दिवशी सर्वप्रथम सकाळी 11 वाजता राजापुरात रिफायनरी विरोधी प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार असुन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. राज ठाकरे यांचे प्रकल्पाबाबतचे मत जगजाहीर असल्याने ते एवढे होऊनही प्रकल्प रद्द न करणार्या शासनाचा कसा समाचार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांची ही बैठक प्रकल्प परिसराऐवजी राजापूर शहरात होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या बैठकीत आता राज ठाकरे नव्याने काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.