Tue, Nov 20, 2018 03:57



होमपेज › Konkan › दुर्गम भागात सौभाग्याचा उजेड

दुर्गम भागात सौभाग्याचा उजेड

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 17 2018 11:10PM

बुकमार्क करा




रत्नागिरी : विशाल मोरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घरात वीज देण्यासाठी ‘सौभाग्य योजना’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत मागेल त्याला वीज जोडणी देण्यात येणार आहे. ही योजना जाहीर झाल्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात 300 वीज जोडण्या देण्यात आल्याची माहिती प्रभारी मुख्य अभियंता पेटकर यांनी दिली.

पंडित दीनदयाळ यांच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सौभाग्य’ ही योजना जाहीर केली आहे. देशातल्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकारने ‘सौभाग्य’ योजना जाहीर केली आहे. या योजनेंंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन देण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत ट्रान्स्फॉर्मर, मीटर आणि तारांसाठी सवलतही देण्यात येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी 13 हजार 750 नवे मीटर प्राप्‍त झाली आहेत. यातील 70 टक्के मीटर नव्या जोडणीसाठी तर 30 टक्के मीटर जुने बदलून देण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. यातील 5 हजार 800 मीटर रत्नागिरी विभागाला, 3 हजार 825 मीटर चिपळूण विभागाला तर 4 हजार 125 मीटर खेड विभागाला देण्यात आले आहेत.

नवीन वीज जोडणी आणि मीटर बदलण्यासाठी ठेकेदारांना नियुक्‍त करण्यात आले असून त्यांच्या दररोज कामाचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यातील गंजलेले वीजखांब, नादुरुस्त रोहित्र पावसाळ्यापूर्वी बदलण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे 60 कोटींच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

जिल्ह्यात भारनियमन करण्यात येत नसले तरी काहीवेळा नैसर्गिक आपत्तीमुळे वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे. जिल्ह्यात थकबाकीचे प्रमाण वाढले असून त्याची वसुली मार्चअखेर करण्यात येणार आहे. थकबाकी जमा केली नाही तर मात्र त्या ग्राहकाची वीज जोडणी तोडावी लागणार आहे. ग्राहकांचा ऑनलाईन वीजबिल भरणा करण्याकडे कल वाढत असून मोबाईलवरून बील भरले जात आहे. 
अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत जिल्ह्यात 80 जणांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यांपैकी 50 जणांना पंप देण्यात आला असून  उर्वरित 30 जणांच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याची कार्यालये भाड्याच्या जागेतून स्वमालकीच्या जागेत उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगण्यात आले.