Mon, Jun 24, 2019 21:17होमपेज › Konkan › मत्स्यअधिकार्‍यांना ‘कासवा’ची प्रतिकात्मक राखी

मत्स्यअधिकार्‍यांना ‘कासवा’ची प्रतिकात्मक राखी

Published On: Aug 27 2018 10:15PM | Last Updated: Aug 27 2018 9:29PM
मालवण :प्रतिनिधी
अनधिकृत मासेमारी कारवाई करताना संथगतीने चालणार्‍या प्रशासनाला जाग आणण्यासाठी श्रमिक मच्छीमार संघाच्यावतीने मच्छीमार महिलांनी सोमवारी मालवण  येथील सहायक आयुक्‍त मत्स्यव्यवसाय कार्यालयातील अधिकार्‍यांना कासवाची प्रतिकात्मक मत्स्यराखी बांधली. ‘आमची उपजीविका, संसार वाचवा’तसेच मासेमारी अधिनियमाची कडक अंमलबजावणी करून तुमच्या कार्यातून मच्छीमार भगिनींना अनोखी ओवाळीने द्या, अशी मागणी  यावेळी करण्यात आली.
दरम्यान, पर्ससीन मासेमारी विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचे लक्ष वेधण्यासाठी मंत्र्यांना पापलेट मासळीची प्रतिकात्मक राखी पाठविण्यासाठी सहायक आयुक्‍त राजकुमार महाडिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
 मच्छीमार नेते रवीकिरण तोरसकर, बाबी जोगी, दिलीप घारे, सेजल परब, संमेश परब, आकांशा कांदळगावकर, मनीषा जाधव, पूनम मेतर, कांचन कोचरेकर, मत्स्य परवाना अधिकारी सतीश खाडे यांच्यासह तालुक्यातील महिला मच्छीमार उपस्थित होत्या. मत्स्य विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना मत्स्य बंधन बांधून औक्षण करण्यात आले. 
गेले काही वर्षे पारंपरिक मच्छीमार व पर्ससीन मासेमारी यांच्यात संघर्ष सुरु आहे. शासनाने अधिसूचना काढल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे किनारपट्टीवर पर्ससीन मासेमारीद्वारे मासळीची लूट केली जात आहे. यात जैवविविधता व सागरी पर्यावरणाचा र्‍हास होत चालला असून मुबलक मासळी जाळीत सापडत नसल्याने तुमच्या बहिणांचा उपजीविका व संसार वाचवा. तुम्ही आमचे भाऊ आहात. तुमच्या भगिनींचे संसार वाचविण्यासाठी अनधिकृत मासेमारीवर कडक कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्या. कारवाई करण्यासाठी तुमच्यावर कोणी दबाव आणत असतील तर आम्ही आमच्या भावाला संघर्ष देऊ, असे भगिनींनी अधिकार्‍यांना सांगितले.
 आकांक्षा कांदळगावकर व सेजल परब यांनी मच्छीमार महिलांच्या व्यथा मांडत तुमच्या रूपाने आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा व्यक्‍त केली. शासनाने केलेल्या कायद्यांची कडक अंमलबजावणी करून मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांनी  कोणाच्या दबावाला बळी न पडता कठोर कारवाईचा राज्यात चांगला संदेश देऊन आम्हा भगिनींना अनोखी ओवाळणी द्यावी, अशा भावना महिलांनी व्यक्‍त करत अपेक्षित कारवाई न झाल्यास यापुढील लढ्याचे मच्छीमार महिला नेतृत्व करतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.