Thu, Apr 25, 2019 23:25होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पुन्हा संघर्ष भडकण्याची चिन्हे!

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पुन्हा संघर्ष भडकण्याची चिन्हे!

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 17 2018 10:48PM

बुकमार्क करा
मालवण : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या एलईडी लाईट पर्ससीन मासेमारीविरोधात मच्छीमार बांधवांनी हल्लाबोल आंदोलन छेडण्याचा निर्णय बैठकीत घेतला. मच्छीमार बांधवांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी भडकण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, प्रशासनाने एलईडी लाईट, पर्ससीन बोटी पकडून वाळू माफियांच्या धर्तीवर या अनधिकृत बोटी फोडून अथवा जाळून टाकल्यास मच्छीमारांच्या वतीने प्रशासनास 5 लाखांचे बक्षीस दिले जाईल, असेही मच्छीमारांनी स्पष्ट केले. मात्र, प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास मच्छीमारच कायदा हातात घेत सिंधुदुर्ग किनारपट्टीवर धुडगूस घालणार्‍या गोवा, गुजरात, मुंबई, रत्नागिरीसह जिल्ह्यातील अनधिकृत एलईडी लाईट, पर्ससीन बोटी ताब्यात घेतील. यावेळी संघर्ष निर्माण झाल्यास त्याला मत्स्य व पोलिस प्रशासनच सर्वस्वी जबाबदार राहील, असा इशारा संतप्‍त मच्छीमारांनी दिला आहे. 

मालवण-दांडी किनारपट्टीवर बुधवारी पारंपरिक, ट्रॉलर, गिलनेट, न्हय अशा सर्वप्रकारच्या मच्छीमार बांधवांची बैठक पार पडली. या बैठकीत मच्छीमारांनी किनारपट्टीवर शासनाने बंदी घातलेली असतानाही एलईडी लाईट मासेमारी राजरोस सुरू आहे. 1 जानेवारीपासून पर्ससीन मासेमारी बंदी कालावधी सुरू झाला. मात्र, एलईडी लाईट मासेमारीचा धुमाकूळ सुरूच आहे. एका बोटीवर प्रखर झोतातील एलईडी लाईट जनरेटरच्या सहाय्याने बसवली जाते. ती लाईट रात्री समुद्रात मारल्यानंतर अगदी खोल समुद्रात तळाशी असलेली मासळीही एकत्र येते. त्यानंतर दुसर्‍या पर्ससीन बोटीचा वापर करून एकत्र झालेली मासळी पकडली जाते. गोवा, रत्नागिरी, गुजरात, मुंबई तसेच जिल्ह्यातील काही मच्छीमार बोटी एलईडी मासेमारी करत आहेत. 

...तर हल्लाबोल आंदोलनास सामोरे जावे लागेल
आम्हाला आता प्रशासनाकडून कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. आमची सहनशीलता संपली. आता संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे गुरुवारपासून हल्लाबोल आंदोलन छेडून मच्छीमारच समुद्रात अनधिकृत एलईडी लाईट मच्छीमारी बोटी पकडून कायदा हातात घेतील. यामध्ये स्थानिक व परप्रांतीय असा कोणताही भेदभाव न करता जे कोणी एलईडी लाईटद्वारे मच्छीमारी करताना दिसतील त्यांच्या बोटी पकडण्यात येतील. तसेच एलईडी लाईट-पर्ससीन बोटींची मासळी जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला अशा कोणत्याही बंदरावर उतरवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा उपास्थित मच्छीमारांनी  घेतला आहे.