होमपेज › Konkan › आंबोलीत २ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

आंबोलीत २ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

Published On: Jun 30 2018 10:54PM | Last Updated: Jun 30 2018 9:59PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत लाखो रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले आहे. शनिवारी पहाटे ही आंबोली येथील हॉटेल जेआरडीसमोर स्कॉर्पिओ गाडीने वाहतूक होत असलेल्या 2 लाख 22 हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह स्कॉर्पिओ कार असा सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संशयित  तानाजी भोजलिंग चोपडे (वय 35, रा. पेन्नूर, मोहोळ, जि. सोलापूर) हा आपल्या ताब्यातील स्कॉर्पिओ कारने गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करत असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना मिळाली. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकत स्कॉर्पिओ कारसह 2 लाख, 22 हजार, 720 रुपयांची दारू जप्त केली. यात 1 लाख, 53 हजार, 600 रुपयांच्या मॅक्डोलच्या 768 बाटल्यांचे 16 बॉक्स, तसेच 69 हजार 120 रुपयांची गोवा बनावटीची रॉयल व्हिस्कीच्या 180 एमएलएच्या 864 बाटल्या असलेले 18 बॉक्स तसेच 6 लाख रुपयांची स्कॉर्पिओ असा एकूण 8 लाख, 22 हजार, 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. ए. पाडाळकर, हवालदार ल. ग. मुपडे, मानस पवार यांनी केली. 

पावसाळा सुरू झाल्यानंतर गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू होते. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने या विषयाकडे आपली करडी नजर फिरविली आहे. गेल्या काही दिवसांत या विभागाने मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू ताब्यात घेतली आहे.