Thu, Mar 21, 2019 15:55होमपेज › Konkan › विदर्भ बँकेवर दरोडा, १५ लाखांचा मुद्देमाल लंपास 

विदर्भ बँकेवर दरोडा, १५ लाखांचा मुद्देमाल लंपास 

Published On: Jul 15 2018 7:49PM | Last Updated: Jul 15 2018 7:49PMकुडाळ (जि. सिंधुदुर्ग): शहर वार्ताहर

मुंबई -गोवा महामार्गावरील पावशी-भटवाडी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेवर (शाखा -पावशी) अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. यात सुमारे पाच लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दहा लाख रूपये किंमतीचे दागिने असा जवळपास पंधरा लाख रूपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज कुडाळ पोलिस निरीक्षक जगदीश काकडे यांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण बँकच या दरोडेखोरांनी लुटल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील पावशी ग्रा. पं. समोर भटवाडी येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची ही शाखा आहे. शुक्रवारी सायंकाळी ही शाखा बंद करून अधिकारी व कर्मचारी घरी गेले. रविवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास या बॅंकेच्या शेजारील घरात भाडेकरू असलेल्या धुरी यांना बँकेची खिडकी तोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या बॅंकेच्या खिडकीचा दरवाजा दरोडेखोरांनी तोडून लोखंडी गज वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर आतील दरवाजे उघडून रोख रक्कम व दागिने ठेवण्याची स्ट्रॉग रूम गॅसकटरने फोडली. त्यातील पाच लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम तसेच दहा लाख रूपये किमतीचे ग्राहकांनी गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले. मात्र, दरोडेखोरांनी चोरीसाठी वापरलेले एक ऑक्सिजन सिलेंडर, एक घरगुती सिलेंडर, गॅसकटर, कटावणी, पहार, स्क्रू आदी साहित्य बॅंकेतच टाकून पलायन केले. 

कुडाळ पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक जगदीश काकडे व त्‍यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्‍थळी धाव घेतली. ठसेतज्ञ व रत्नागिरी येथील श्वान पथकही  घटनास्‍थळी दाखल झाले. बॅंकेच्या कॅशिअर अदिती ठुंबरे यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

चोरटे सराईतस असून चोरीतील सामान आणण्यासाठी दरोडेखोरांनी मोठ्या वाहनाचाही वापर केला आहे. येथील सायरन बंद आणि सीसीटिव्ही कॅमेरा अथवा सुरक्षा रक्षकही नियुक्त केलेला नाही. शिवाय दरोडेखोरांनी तोडलेली खिडकीही पुर्णतः कमकूवत झाली होती. दोनच दिवसांपूर्वी कुडाळ पोलिस निरीक्षकांनी सर्व बॅंक अधिकाऱ्यांची बैठक घेत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुचना दिल्या होत्या.  महामार्गावर गाडी उभी करून अगदी सराईतपणे दरोडा टाकत गॅसकटरने स्ट्राँग रूमसह तिजोरी फोडली. गॅसचा वापर करण्यात आला आहे.