होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग राज्यात सातव्यांदा चॅम्पियन

सिंधुदुर्ग राज्यात सातव्यांदा चॅम्पियन

Published On: May 31 2018 1:39AM | Last Updated: May 31 2018 1:09AMकणकवली : प्रतिनिधी

बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये सिंधुदुर्गने राज्यात सलग सातव्यांदा अव्वल स्थान कायम ठेवले आहे. कोकण बोर्डही दरवर्षीप्रमाणे राज्यात अव्वल ठरला आहे. गुणवत्तेत ‘कोकण पॅटर्न’ निर्माण झाला आहे. सिंधुदुर्गचा बारावी परीक्षेचा निकाल 96  टक्के, तर रत्नागिरीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. कोकण बोर्डाचा निकाल राज्यात सर्वाधिक 94.85 टक्के लागला आहे.  

कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजची विज्ञान शाखेची साक्षी एकनाथ पिंगुळकर हिने 95.23 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा कॉलेजची विज्ञान शाखेची प्रणिता रवींद्रनाथ राऊळ हिने 94.15 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर कुडाळ हायस्कूल ज्युनि. कॉलेजची वाणिज्य शाखेची मृणाल गिरीश सरवटे हिने 93.38 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक, तसेच कणकवली कॉलेजची विज्ञान शाखेची  जुही संदीप वालावलकर हिने 93.23 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात चतुर्थ क्रमांक व पंचम खेमराज सावंतवाडीची विद्यार्थिनी तनया रामचंद्र वाडकर हिने 93.7 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे, पहिल्या पाच क्रमांकातील या पाचही मुलीच आहेत. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. बारावी परीक्षेच्या निकालात  सिंधुदुर्गच्या  विद्यार्थ्यांनी सलग सातव्या वर्षी आघाडी घेत जिल्ह्याचे नाव राज्यात उज्ज्वल केले आहे.  बारावी परीक्षेसाठी सिंधुदुर्गातून 11 हजार 627 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 11 हजार 619 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यातील 11 हजार 154 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील 1023 विद्यार्थी विशेष श्रेणीत, 5578 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 4368 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 185 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याच्या विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 99.09 टक्के लागला असून 2846  पैकी 2820 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल 91.12 टक्के लागला असून 2825 विद्यार्थ्यांपैकी 2574 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल 98.73  टक्के लागला असून 4893 विद्यार्थ्यांपैकी 4831  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर व्होकेशनल शाखेचा निकाल 88.06 टक्के लागला असून 1055 विद्यार्थ्यांपैकी 929 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

कोकण बोर्डात परीक्षेस बसलेल्या 33 हजार 39 विद्यार्थ्यांपैकी 31 हजार 336 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डात 2372 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, 12944 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 14912 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, तर 1108 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाचा विज्ञान शाखेचा निकाल 97.96 टक्के, कला शाखेचा निकाल 88.42 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 97.57 टक्के, तर व्होकेशनल शाखेचा निकाल 91.08 टक्के लागला आहे. 

पुनर्परीक्षार्थींचा जिल्ह्याचा निकाला 33.33 टक्के
पुनर्परीक्षार्थींचा सिंधुदुर्गचा निकाल 33.33 टक्के लागला आहे.रत्नागिरीचा निकाल 37.69 टक्के लागला आहे. सिंधुदुर्गात परीक्षेस बसलेल्या 129 विद्यार्थ्यांपैकी 43 विद्यार्थी पास झाले आहेत. कोकण बोर्डाचा पुनर्परीक्षांर्थींचा निकाल 36.62 टक्के लागला आहे. 

निकालात मुलींचीच सरशी कायम
 सिंधुदुर्गातील बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 94.19 टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 97.84 टक्के आहे.  दरवर्षी या निकालात मुलींचीच सरशी कायम राहिली आहे. परीक्षेस बसलेल्या 5871 मुलांपैकी 5530 मुले आणि 5748 मुलींपैकी 5624 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

100 टक्के निकालांच्या कॉलेजमध्ये घट
गतवर्षी 30 ज्युनिअर कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला होता. यामध्ये यावर्षी काहीशी घट झाली आहे. यावर्षी 19 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील भगवती ज्युनि. कॉलेज, एस. एम. ज्युनि. कॉलेज कणकवली, कळसुली ज्युनि. कॉलेज, राजाराम ज्युनि. कॉलेज फोंडाघाट,  बिडवाडी ज्युनि. कॉलेज, हरकुळ बुद्रुक ज्युनि. कॉलेज, के. टी. सावंत उच्च माध्यमिक कॉलेज नाटळ, जांभवडे ज्युनि. कॉलेज, आवळेगाव ज्युनि. कॉलेज, डॉन बॉस्को ज्युनि. कॉलेज ओरोस, पुष्पसेन सावंत ज्युनि. कॉलेज हुमरमळा,  कुडाळ ज्युनि. कॉलेज, न्यू शिवाजी हायस्कूल ज्युनि. कॉलेज पणदूर, भंडारी एज्यु. ज्युनि.कॉलेज मालवण, वराड ज्युनि. कॉलेज, असरोंडी ज्युनि.कॉलेज, सिंधुदुर्ग मिलेटरी स्कूल आंबोली, साळुंखे-पाटील ज्युनि.कॉलेज कुसूर, पवार विद्यालय या कॉलेजचा समावेश आहे.  बुधवारी दुपारी ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सायबर कॅफेवर गर्दी केली होती. विद्यार्थ्यांना त्याची गुणपत्रिका कॉलेजमध्ये उपलब्ध होणार आहेत. गतवर्षीप्रमाणेच यावर्षी निकाल वेळेवर लागल्याने विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

कोकण बोर्ड अव्वलच
कोकण बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल राज्यात सलग सातव्या वर्षी सर्वाधिक 94.85 टक्के लागला आहे, तर कोल्हापूर बोर्डाचा 91 टक्के, पुणे बोर्डाचा निकाल 89.58 टक्के, नागपूर बोर्डाचा 87.57 टक्के, औरंगाबाद बोर्डाचा 88.74 टक्के, मुंबई बोर्डाचा 87.44 टक्के, अमरावती बोर्डाचा 88.08 टक्के, नाशिक बोर्डाचा 86.13 टक्के, लातूर बोर्डाचा 88.31 टक्के.