Tue, Jul 23, 2019 04:19होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात कमबॅक!

सिंधुदुर्गात कमबॅक!

Published On: Jun 17 2018 10:27PM | Last Updated: Jun 17 2018 10:10PMकणकवली : मान्सूनच्या दमदार आगमनानंतर गेले आठ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवार सकळपासून जिल्ह्यात कमबॅक केले. पावसाच्या या आगमनामुळे शेतकरी, बागायतदार, मच्छीमार असे सर्वच सुखावले आहेत. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या, आंबा-काजू बागायतींमधील मशागतीची कामे, खाडीतील मच्छीमारी अशा सर्वच कामांना आता गती मिळणार आहे.
जिल्ह्यात 5 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर पुढील चार-पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळला. पावसामुळे खरीप शेती हंगामाला प्रारंभ झाला. प्रामुख्याने भात पेरणीची कामे सुरू झाली. नदी-नाले प्रवाहित झाल्याने व विहिरींना पाणी आल्याने टंचाईची समस्याही निकाली निघाली. उन्हाळ्यातील उष्णतेने त्रस्त जनतेलाही गारव्याचा दिलासा मिळाला. मात्र, सात-आठ दिवसांपूर्वी पाऊस अचानक गायब झाला. यामुळे भात पेरण्यांची कामे खोळंबली. दरम्यान, कडक उन्हामुळे सरासरी तापमानात पुन्हा वाढ झाली. दुसरीकडे मान्सूनपूर्व पावसात पेरणी झालेली व उगवलेली भारत रोपे पावसाअभावी वाळून जाण्याची भीती  निर्माण झाली. कलमांना खते देण्याची कामे थांबली तर खाडीतील पारंपरिक मासेमारीवरही  चिपरीत परिणाम झाला. एकंदरीत पावसाने दडी मारल्याने शेतकरी, मच्छीमारांबरोबरच सर्व सामान्य नागरिक ही चिंताग्रस्त झाले होते. मात्र पावसाने वेळीव पुन्हा सुरुवात केल्याने सर्वजण सुखावले  आहेत.  जिल्ह्यात रविवारी दिवसभर सर्वच ठिकाणी पाऊस झाला. काही भागात अधून- मधून सरी कोसळत होत्या तर काही भागात पावसाची संततधार सुरू होती.

देवगड तालुक्यात संततधार 

देवगड : प्रतिनिधी

देवगड तालुक्यात पावसाने पुन्हा कमबॅक केले असून यामुळे चिंताग्रस्त बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यात दमदार हजेरी लावलेल्यानंतर पावसाने आठ दिवस दडी मारली होती. मात्र, रविवारी सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. आठ दिवस पावसाने  दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.

रविवारपासून पावसाने कमबॅक केल्यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांचा कामांना सुरुवात होणार आहे.देवगड तालुक्यात पावसाने सकाळपासून सुरूवात केल्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचून काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती.दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत  झाले.

 पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांबरोबरच आंबाबागायतदारांमधून समाधान व्यक्त होत आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर  शेतकर्‍यांनी भात पेरणी व आंबा बागायतदारांनी कलमांना खत देण्याची कामे सुरू केली होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने ही कामे खोळंबली होती.

खोल समुद्रातील मच्छीमारी बंद झाल्यानंतर पावसाळ्यात खाडीमधील पारंपरिक मच्छीमारी सुरू होते.ही मच्छीमारीही पावसावर अवलंबून असल्यामुळे  पाऊस सुरू झाल्याचा आनंद पारंपरिक मच्छीमारांमधूनही  व्यक्त होत आहे.

रविवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, तालुक्यात कोठेही मोठ्या प्रमाणात पडझडीच्या घटना घडल्या नसल्याचे आपत्ती नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले. सायंकाळनंतर वीजपुरवठा खंडीत झाला होता तर बीएस्एन्एल् सेवाही कोलमडली होती.तालुक्यातील काही ठिकाणची घरगुती टेलिफोन सेवा बंद होती.

सावंतवाडीत मुसळधार सरी; विजेचा लंपडाव

सावंतवाडी : शहर वार्ताहर

गेल्या आठ दिवसांपासून गायब असलेल्या पावसाने रविवारी पुन्हा हजेरी लावली. रविवारी सावंतवाडी तालुक्यात बर्‍यापैकी पडलेल्या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. मात्र, पावसाने पुन्हा सुरुवात केल्यावर विजेचा लपंडाव सुरू झाला असून रविवारी तालुक्याच्या अनेक भागातील वीज गायब होती.

मान्सूनचे आगमन झाल्यावर गत रविवारी सावंतवाडीसह पूर्ण तालुक्यात धुवाँधार पाऊस पडला होता. मान्सूनच्या आगमनानंतर पहिले तीन दिवस जोरदार पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी शेतीच्या कामासही सुरुवात केली होती.  मात्र, त्यानंतर जवळपास आठ दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात होती. पाऊस गायब होऊन चक्क कडक ऊन पडत असल्याने भात शेतीसह काजू पिकाची लागवडही धोक्यात आली होती.

या पार्श्‍वभूमीवर रविवारी पावसाने दमदार हजेरी लावत शेतकर्‍यांना दिलासा दिला. तालुक्यात दिवसभर पावसाची रिपरिप चालू होती. तर संध्याकाळी साडेसहानंतर मुसळधार पाऊस पडला. जवळपास अर्धा तास पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान,पावसाचे आगमन होताच विजेच्या समस्येने डोके वर काढले आहे. रविवारी संध्याकाळी सावंतवाडी शहरासह तालुक्यातील अनेक भागातील वीज गायब होती. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच विजेच्या समस्येने डोके वर काढल्याने नाराजी व्यक्त होत आहे.