Thu, Apr 25, 2019 05:28होमपेज › Konkan › पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन

पोलिसांचे ‘ऑल आऊट’ ऑपरेशन

Published On: Feb 13 2018 2:02AM | Last Updated: Feb 12 2018 11:00PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

 जिल्ह्यातील अवैध  धंद्यांविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी  कडक पाऊल उचलल्यानंतर जिल्ह्यात घरफोडीसारख्या गुन्ह्यांची वाढ दिसू लागली आहे. याचीही गंभीर दखल जिल्हा पोलिस दलाने घेतली आहे. रविवारी जिल्हाभर ऑल आऊट ऑपरेशन करीत पोलिस यंत्रणेने तब्बल 703 संशयित ताब्यात घेतले आहेत. पोलिसांच्या या कारवाई मोहिमेत जिल्ह्यातील 37 संवेदनशील ठिकाणी छापेमारी करण्यात आली. 36  वाहने तसेच सराईत आणि वाँटेड आरोपीही पोलिसांच्या हाती लागले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखालील या पोलिसी कारवाईमुळे अवैध आणि गुन्हेगारी गोटात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात जेव्हा पोलिस दलाकडून अवैध धंद्याविरोधात कठोर पाऊल उचलले जाते. त्याच वेळी घरफोड्या, चोर्‍या अशा भुरट्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत होते. पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी याची दखल घेत या गुन्हेगारी  विरोधात कारवाईचे फास आणखी घट्ट केले. रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेपर्यंत पोलिस दलाचे हे छापासत्र जिल्हाभर सुरू होते. यात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या लोकांवर पोलिसांची कारवाई सुरू झाली.

जिल्ह्यातील 37 संवेदनशील ठिकाणांची 24 हॉटेल्स, लॉज,  सरप्राईज चेकिंग काही तपासणी नाके या ठिकाणी छापे टाकण्यात आले. जिल्ह्यात एकाच वेळी अशी मोठी कारवाई प्रथमच झाली असून गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले अनेक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. 705 संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले असून यात 36 वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यापूर्वीच्या काही गुन्ह्यांत पोलिसांना हवे असलेले 12 संशयित आरोपी पोलिसांना ताब्यात मिळाले आहेत, तर 8 सराईत आरोपी तर 16 मोस्ट वाँटेड संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. 

पोलिसांच्या या धडक मोहिमेत 21 अधिकारी 82 पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. सध्या जिल्ह्यात महामार्ग रुंदीकरणाचे काम विविध बांधकामांच्या साइट्स सुरू आहेत. ज्यात अनेक परप्रांतीय कामगार दाखल झाले आहेत. त्यांची नावे, पत्ते, संपर्क नंबर, ओळख याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांनी गोळा करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.