Mon, May 20, 2019 20:05होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : पणदूरतिठा येथे रोखले चौपदरीकरणाचे डंपर्स

सिंधुदुर्ग : पणदूरतिठा येथे रोखले चौपदरीकरणाचे डंपर्स

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMकुडाळ : शहर वार्ताहर

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी होत असलेल्या माती वाहतुकीमुळे निर्माण होणार्‍या धुरळ्याचा त्रास वाहनधारकांसह व्यापारी, प्रवासी व नागरिकांना होत आहे. त्यामुळे संबंधित दिलीप बिल्डकॉन कंपनीने रस्त्यावर पाणी मारावे तसेच डंपरवर ताडपत्री टाकून माती वाहतूक करावी या मागणीसाठी रविवारी पणदूरतिठा येथे ग्रामस्थ व व्यापार्‍यांनी एकवटत महामार्गासाठी होणार्‍या माती वाहतुकीचे डंपर रोखले. दरम्यान, दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या व्यवस्थापनाने याबाबत आवश्यक कार्यवाहीचे आश्‍वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले.

महामार्ग चौपदरीकरणासाठी अणाव येथे माती काढून त्या मातीची वाहतूक अणाव-पणदूर रस्त्यावरून केली जात आहे. मात्र, माती वाहतूक करणार्‍या डंपरवर ताडपत्री टाकली जात नाही. शिवाय रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने या वाहतुकीमुळे निर्माण होणारी धूळ परिसरात पसरत आहे. पणदूर तिठ्यावरील दुकानांमध्येही ही धूळ जात आहे. वाहनधारक व पादचारी नागरिकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पणदूर सरपंच दादा साईल यांच्यासह पणदूर व अणाव ग्रामस्थ व व्यापारी यांनी आक्रमक होत रविवारी सकाळी पणदूर - अणाव रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करीत माती वाहतूक करणार्‍या दिलीप बिल्डकॉन कंपनीचे डंपर रोखले. डंपरवर ताडपत्री टाकूनच मातीची वाहतूक करावी तसेच रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था तातडीने करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दादा साईल यांच्यासह ग्रामस्थांनी देताच दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या व्यवस्थापनाने घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच तातडीने रस्त्यावर पाणी मारत यापुढे योग्य ती काळजी घेऊनच मातीची वाहतूक करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

आवश्यक कार्यवाही तातडीने करा

पणदूरतिठा येथील विविध समस्यांबाबत सरपंच दादा साईल यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनी व महामार्ग प्रशासनाचे लक्ष वेधून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी विनायक अणावकर, नंदकिशोर पारकर आदींसह व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.