होमपेज › Konkan › मुसळधार सुरूच 

मुसळधार सुरूच 

Published On: Jul 10 2018 10:47PM | Last Updated: Jul 10 2018 10:29PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने आपला जोर कायम ठेवला असून, मंगळवारीही जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आले असून नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. या धुवाधार पावसामुळे ठिकठिकाणी मार्ग ठप्प होऊन, बाजारपेठांमध्ये पाणी घुसून जनजीवन विस्कळीत झाले. डामरे-गावठणवाडी येथील सौ. माधुरी मधुकर सावंत (वय 55) या महिलेचा ओहोळाच्या पुरात वाहून मृत्यू झाला. पुढील दोन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टीची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 
मुंबईसह कोकणात पावसाचे धुमशान सुरू असून सातत्याने पाऊस कोसळत असल्याने नदीनाल्यांना पूर आले आहेत. मंगळवारी माणगाव आणि बांदा बाजारपेठांत पाणी घुसल्याने व्यापारी आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. तसेच काही प्रमाणात नुकसानही झाले. दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर येथे झाड पडल्याने दोडामार्ग-तिलारी राज्यमार्ग काही काळ ठप्प झाला होता. तर सावंतवाडी-कोलगाव-काजरकोंड पूल पाण्याखाली गेल्याने त्या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. मंगळवार सकाळपासून अगदी सायंकाळपर्यंत नॉनस्टॉप पाऊस कोसळत होता. यामुळे घरे, गोठे, रस्त्यांवर झाडे, फांद्या पडून नुकसानीच्या घटना सुरूच आहेत. येत्या दोन दिवसात तीव्र स्वरूपाची अतिवृष्टी होण्याची शक्यता असून जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत सरासरी 250 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर अनेक ठिकाणी पडझड होऊन नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात जून अखेर सुमारे 31 लाखाचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. मात्र, त्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन नुकसानीच्या घटना घडलेल्या असताना आजही जिल्हा प्रशासनाकडे नुकसानीचा आकडा निश्‍चित नाही.

जिल्ह्यातील नदी पातळी धोकादायक

गेल्या चार दिवसातील या सततच्या धुवाँधार पावसामुळे सिंधुदुर्गातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामध्ये तिलारी नदी धोका पातळी 43.600 मीटर,  इशारा पातळी 41.600 मीटर, आजची पातळी 38.50 मीटर, कर्ली नदी धोका पातळी 10.910 मीटर, इशारा पातळी 9.910 मीटर, आजची पातळी 6.2 मीटर, वाघोटन नदी धोका पातळी 10.500 मीटर, इशारा पातळी 8.500 मीटर, आजची पातळी 3.10 मीटर अशी नद्यांच्या पातळीची स्थिती प्रशासनाने स्पष्ट केली आहे.

नुकसानीची माहिती अपडेट नाही

ठिकठिकाणी झालेल्या पडझडीत सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असे असतानाही  नुकसानीची ‘अपडेट’ नसल्याचे चित्र सध्या आहे. जिल्ह्यातील तलाठी, अधिकारी वर्ग सातबारा संगणीकरणाच्या कामात गुंतल्याने या अतिवृष्टीमध्येही नुकसानीचा पंचनामा करण्याकडे  दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने नुकसानग्रस्त अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.