होमपेज › Konkan › अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ३० लाखांचे नुकसान!

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ३० लाखांचे नुकसान!

Published On: Jun 21 2018 10:56PM | Last Updated: Jun 21 2018 10:48PMसिंधुदुर्ग : प्रतिनिधी

बुधवारी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी घरे, गोठे कोसळून, घरांवर झाडे पडून, तसेच घरांमध्ये पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्य भिजून व अन्य कारणांनी मिळून सुमारे 30 लाखांचे नुकसान झाले. ही आकडेवारी गुरुवारी सायंकाळपर्यंतच्या पंचनाम्यावर आधारित असून, अजूनही ग्रामीण भागातील नुकसानीचे पंचनामे होणे बाकी आहेत. नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तरी किनारपट्टी भागातील अनेक परिसर अजूनही पाण्याखाली आहेत. काही ठिकाणी रस्ते खचल्याने, पूल वाहून गेल्याने त्या भागाचा संपर्क तुटला आहे. या अतिवृष्टीत मनुष्यहानी झाली नसली तरी एक-दोन ठिकाणी गोठ्याच्या भिंती कोसळून गाई-गुरे व कोंबड्या गाडल्या गेल्या. मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत किनारपट्टी भागात धुव्वाँधार पाऊस झाला. काहीवेळा पावसासोबतच जोरदार वारे व मेघगर्जना झाली. देवगड तालुक्यात तर ढगफुटीप्रमाणे पाऊस झाला. यामुळे कुवळे गावातील पाच शेतबंधारे वाहून गेले. मोंडपार येथील खारबंधारा फुटल्याने खारे पाणी शेतात घुसून नुकसान झाले. कुवळे-वीरवाडी रस्ता वाहून गेल्याने या भागाचा संपर्क खंडित झाला आहे. तालुक्यातील पुरळ-हुर्शी, गडदेवाडी, कोठारवाडी या भागात अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. वाडा-चांभारघाटी रस्ता तसेच किनारपट्टी गावातील अनेक रस्ते गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाण्याखाली होते. अनेक घरांवर व वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने नुकसान झाले आहे.अनेक गावे विजेअभावी अंधारात आहेत. महसूल यंत्रणेकडून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. नुकसानीचा निश्‍चित आकडा समजू शकला नाही. तरीही सुमारे 7 ते 8 लाखांचे नुकसान तालुक्यात झाल्याचा अंदाज आहे.

बुधवारी दिवसभरात वेंगुर्ले तालुक्यात सरासरी 319 मिमी. पाऊस पडला. तालुक्यात विविध ठिकाणी मिळून सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले. परुळे बाजार व म्हापण-गोसावीवाडी येथील रस्ता वाहून गेला असून वेंगुर्ले कॅम्प परिसर गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत पाण्याखाली होता. शहरातील शासकीय मुलींच्या वसतीगृहात पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांचे साहित्य, धान्य व अन्य साहित्याचे नुकसान झाले. खानोली-तळेकरवाडी व तुळस-पलतडवाडी या मार्गांवर घळण कोसळल्याने वाहतूक बंद होती. 

मालवण तालुक्यात सर्वाधिक सरासरी 345 मि.मी. एवढा पाऊस गेल्या चोवीस तासात झाला. तालुक्यात विविध घटनांमध्ये मिळून सुमारे 8 लाख 31 हजारांचे नुकसान झाले आहे. देवली-काळेथर मार्गावर दरड कोसळल्याने मार्गावरील वाहतूक दिवसभर ठप्प होती. शहरातील धुरीवाडा, देऊळवाडा, आडवण, वायरी, रेवतळे, मेढा, कोथेवाडा या भागात अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी घुसले. यामुळे सुमारे 4 लाखांचे नुकसान झाले. मालवण बंदरजेटी येथील एका घराची भिंत कोसळून सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले. काळेथर येथील एका घरावर दरड कोसळल्याने घरातील साहित्य गाडले जाऊन सुमारे 1 लाख 40 हजारांचे नुकसान झाले. याबरोबरच नांदोस, चौके, देवबाग, तारकर्ली या गावांमध्येही नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.