Wed, Mar 27, 2019 05:57होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात ६८ हजार २९१ घरगुती गणपती

सिंधुदुर्गात ६८ हजार २९१ घरगुती गणपती

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 11 2018 11:25PMओरोस : प्रतिनिधी

कोकणचा महाउत्सव गुरुवार, दि. 13 पासून सुरू होत आहे. या निमित्त जिल्ह्यात लाखो चाकरमानी दाखल होत आहेत. या वर्षी  जिल्ह्यात 68 हजार 291 घरगुती व 35 सार्वजनिक गणेशमूर्ती स्थानापन्‍न होणार आहेत. या महाउत्सवासाठी नागरिकांबरेाबरच प्रशासन सज्ज झाले आहे. 

घरगुती गणेशमूर्तींच्या संख्येत वाढ

मुंबई, पुण्यापेक्षा सिंधुदुर्गात सार्वजनिक गणपतींचे प्रमाण कमी असले, तरी घरोघरी गणपतीपूजन प्रथा पिढ्यान्पिढ्या आहे. यावर्षी  सरासरी 200 घरगुती  गणपती मूर्तींची वाढ  झाली आहे.

जिल्ह्यात 35 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव

गेल्या काही वर्षांपासून कुडाळ येथे नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गचा राजा गणेश उत्सवाला सुरुवात केली आहे. यासह जिल्ह्यात दोडामार्ग 5, बांदा 2, सावंतवाडी 6, कुडाळ 5, आचरा 1, वेंगुर्ले 3, मालवण 2, देवगड 1, कणकवली 6, वैभववाडी 4 असे एकूण 35 सार्वजनिक गणेशोत्सव  साजरे होणार आहेत.  

सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त

गणेशोत्सव काळात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणा कार्यरत आहे. गणेशोत्सव कालावधीत नियमन व जिल्हाधिकार्‍यांनी 37 अन्वये नियमण आदेश जारी केला आहे. जिल्ह्यात दाखल होणार्‍या चाकरमान्यांच्या, गणेशभक्‍तांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त 24 तास फिरते पथक तसेच सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे वाहन चालकांचा थकवा दूर करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चहापाण्याची 
सोय केली आहे. पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलिस गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे. यासाठी फिक्स पॉईंट, राहूरी पॉईंट आणि जि. प. पेट्रोलिंग, मोटर सायकल पेट्रोलिंगसाठी जिल्ह्यात 30 अधिकारी 120 कर्मचारी आणि 31 वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रंदिवस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय महामार्गावर कुठेही अपघात, अनुचित प्रकाराची दखल घेऊन 6 जेसीबी, 5 क्रेन, 5 मोबाईल व्हॅन कार्यरत ठेवले आहेत. या शिवाय आरोग्य विभागाकडून 108 वाहन सुविधा उपचार निदान पथके प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. सार्वजनिक गणेशमूर्तींच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने पोलिसांबरोबरच  होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

साथ रोगांवर नियंत्रणठेवण्यासाठी आरोग्य पथके

गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात येणार्‍या चाकरमान्यांमुळे साथरोगांचा धोका उद्भवण्याची भीती असते, या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने गेल्या दोन दिवासंपासून सर्व एसटी स्थानके, रेल्वे स्टेशन येथे आरोग्य पथके तैनात केली आहेत.या पथकांकडून चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.  जलप्रदूषण रोखण्याचे आवाहन गणपती उत्सवातील निर्माल्य, फळे, सजावटीचे साहित्य श्रीगणेश विर्सजनाबरोबर नदी, नाले, तळ्यात टाकले जाते. यामुळे जलप्रदुषणाचा धोका वाढतो. यासाठी नागरीकांनी गणेश विसर्जन करताना निर्माल्य जलस्त्रोतात टाकू नये. आपल्या विधायक कृतीतून जलप्रदूषण रोखण्यास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी केले आहे. 

महागाईचे सावट

यावर्षीही गणेश उत्सवावर महागाईचे सावट आहे. रास्त धान्य दुकानांवर शासनाने तेल, डाळ, साखर ही उपलब्ध केलेले नाही तर  धान्यातही कमी प्रमाण दिले आहे. केळी, सफरचंद व धान्य, डाळ साहित्यांचे दर महागल्याने गणेश उत्सवावर  महागाईचे सावट आहे.