Thu, Mar 21, 2019 11:07होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : किल्‍ले होडी वाहतूक होणार! 

सिंधुदुर्ग : किल्‍ले होडी वाहतूक होणार! 

Published On: Dec 31 2017 1:29AM | Last Updated: Dec 30 2017 11:29PM

बुकमार्क करा
मालवण : प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात 9 जानेवारीला मंत्रालयात संबंधित विभागाच्या मंत्र्याच्या उपस्थितीत बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी दिल्यानंतर किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने आपले आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. मात्र, येत्या महिनाभरात मागण्यांची पूर्तता न झाल्यास 1 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिले.

दरम्यान, किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटनेने आपले आंदोलन स्थगित केले असले तरी समुद्राला आलेल्या ओहोटीमुळे बंदर जेटीवर होड्या लावणे मुश्किलीचे असल्याने पर्यटकांना काही काळ किल्ले सिंधुदुर्ग दर्शन हे मालवण बंदर जेटी येथूनच घ्यावे लागले. किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने बंदर विभागाला प्रलंबित मागण्यांचे निवेदन केले.

पर्यटकांत संभ्रम

मालवण : प्रतिनिधी  निवेदन सादर करूनही महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे  सोमवार 1  जानेवारीपर्यंत किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने शुक्रवारी पत्रकार परिषद घेत जाहीर केला. ऐन पर्यटन हंगामात पर्यटकांना किल्ले दर्शनापासून वंचित राहण्याची वेळ या आंदोलनामुळे निर्माण झाली होती. यासंदर्भात शनिवारी  पालकमंत्री दीपक केसरकर यांनी किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधत संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात येत्या 9  जानेवारीला मंत्रालयात बैठक घेतली जाणार आहे. यात प्रलंबित समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. याचबरोबर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनीही संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधत येत्या आठवड्यात संघटनेच्या विविध समस्यासंदर्भात बैठक घेऊन त्याचा अहवाल तयार केला जाईल. हा अहवाल मंत्रालयात होणार्‍या बैठकीत सादर केला जाईल, असे स्पष्ट केले. त्यानुसार प्रवासी होडी वाहतूक संघटनेने आपले आंदोलन तूर्त स्थगित करत असल्याचे स्पष्ट केले. 

भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनीही प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या पदाधिकार्‍यांची भेट घेत समस्यासंदर्भात संबंधित विभागाच्या मंत्र्याचे लक्ष वेधून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल ,असे आश्वासन दिले आहे. किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटनेने आपले आंदोलन तूर्त स्थगित केल्यानंतर शनिवारी सकाळी 10.30 वा. किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे किल्ले दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना किल्ले दर्शनाचा लाभ मिळाला.