Wed, Jul 24, 2019 07:51होमपेज › Konkan › आंबोलीत बेळगावचा युवक अपघातात ठार, एक गंभीर

आंबोलीत बेळगावचा युवक अपघातात ठार

Published On: Jul 22 2018 8:16PM | Last Updated: Jul 22 2018 8:47PMआंबोली : निर्णय राऊत

आंबोली-गेळे फाटा येथे कार आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात  दुचाकीस्वार भरत पद्मनेश हांजे (वय 26, रा. अनगोळ-बेळगाव) याचा मृत्यू झाला तर बसवलिंग धनाचार्य (28, रा. बेळगाव) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी संध्याकाळी 4 वा. च्या सुमारास  वेंगुर्ले-बेळगाव राज्यमार्गावर गेळे फाटानजीक झाला.

रविवारची सुट्टी असल्याने भरत हांजे व त्याचा मित्र  बसवलिंग धनाचार्य हे दोघे वर्षा पर्यटनासाठी स्कूटर (केए 22 ई एल 5633) घेऊन आंबोलीच्या दिशेने येत होते. तर दत्तात्रय सुभाष जांभदाळे (रा. लातूर) हेे कार घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. गेळे फाट्याजवळ ही दोन्ही वाहने आली असता त्यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामध्ये स्कूटरस्वार भरत हांजे हा रस्त्यावर आदळल्याने डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्‍तस्त्राव झाला. तर  बसलिंग धनाचार्य हा गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तत्काळ 108 रुग्णवाहिकेला कळवल्यावर आंबोली येथील 108 क्र. रुग्णवाहिका घेऊन डॉ.अभिजीत मोराळे घटनास्थळी पोहोचले. दरम्यान  रविवार असल्याने आंबोली पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनांची गर्दी होती.घाटमार्गातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या जखमींना आजरा येथे नेण्यात आले. मात्र, भरत हांजे  याचा  वाटेतच  मृत्यू झाला. आंबोली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस  हवालदार राजेश गवस यांनी पंचनामा केला.