Fri, Jul 19, 2019 07:07होमपेज › Konkan › विमानाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्हावासीय उत्सुक

विमानाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्हावासीय उत्सुक

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 11 2018 11:42PMकुडाळ : प्रतिनिधी

चिपीच्या माळरानावर आयआरबीने उभारलेल्या सिंधुदुर्ग एअरपोर्टवर पहिलेवहिले विमान उतरण्याचा मुहूर्त समीप आला आहे. बुधवारी सकाळी 10 वा. हे विमान मुंबई विमानतळावरून सिंधुदुर्ग विमानतळाकडे झेपावणार आहे. 11.30 वा. च्या सुमारास सिंधुदुर्ग विमानतळावर उतरणार आहे. या विमानाच्या स्वागतासाठी अवघा सिंधुदुर्ग जिल्हा उत्सुक असून बुधवारी चिपी विमानतळ परिसरामध्ये सिंधुदुर्गवासीय मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून लोकांना बसण्यासाठी शामियाना उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गवासीयांना या विमानतळाच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. घाईगडबडीत या विमानाचे लँडिंग होणार असले तरी आयआरबी कंपनी आणि विमान प्राधिकरणने सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. त्यासाठी तंत्रज्ञ युद्धपातळीवर काम करत आहेत. दुपारी 11.30 वा. उतरणारे विमान दुपारी 1.30 वा. पुन्हा टेकऑफ घेऊन मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी हे विमानाचे ट्रायल लँडिंग यशस्वी आणि सुरक्षित व्हावे, यासाठी सर्व उपाययोजना करण्यात गुंतले होते. आयआरबी कंपनीचे अधिकारीही पहिल्या विमानाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग विमानतळ सज्ज रहावे यासाठी पूर्वसंध्येला सर्व ती काळजी घेत होते. मुख्य टर्मिनलच्या आवारात स्वच्छतेसाठी व साफसफाईसाठी अनेक कर्मचारी मंगळवारी रात्रीपर्यंत राबत होते.