Wed, Apr 24, 2019 16:34होमपेज › Konkan › सिंधुदुर्गनगरीत पोलिसाच्या पत्नीची आत्महत्या

सिंधुदुर्गनगरीत पोलिसाच्या पत्नीची आत्महत्या

Published On: Jul 13 2018 10:48PM | Last Updated: Jul 13 2018 10:05PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

मूळ चिंदर, ता. मालवण येथील रहिवासी आणि सध्या  सिंधुदुर्गनगरी-भावनगर येथे राहणारी सौ. गीताली किशोर पाडावे यांनी आपल्या भाड्याच्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे 3 वा. च्या सुमारास घडली. 

 किशोर मोहन पाडावे सिंधुदुर्ग पोलिस विभागात चालक म्हणून सिंधुदुर्गनगरी मुख्यालय येथे कार्यरत आहेत. गेली दोन वर्ष ते पत्नी व मुलांसमवेत भावनगर येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहतात. सध्या ते वैद्यकीय रजेवर होते. गुरुवारी रात्री जेवणानंतर ही सर्व मंडळी एकत्रच खोलीत झोपली होती. गुरुवारी पहाटे 3 वा. च्या सुमारास झालेल्या आवाजाने किशोर यांना जाग आली. त्यावेळी पत्नी नसल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी आवाजाच्या दिशेने आतल्या खोलीत धाव घेतली असता, पत्नी गीताली यांनी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.  त्यांनी शेजार्‍यांना उठवत तिला खाली उतरवत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी त्या मृत झाल्या होत्या. याबाबतची खबर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर लागलीच सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदाताई पाटील यांच्या पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट असून अधिक तपास श्रीमती पाटील या करत आहेत. 

गीताली आणि किशोर यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना आठ वर्षाची एक मुलगी आणि तीन वर्षांचा एक मुलगा आहे. पूर्वाश्रमीच्या गीताली निरवडेकर यांचे माहेर  सावंतवाडी- सालईवाडा येथे आहे.  गीताली यांनी आत्महत्या का केली  हे समजू शकले नाही.