Wed, Mar 20, 2019 02:54होमपेज › Konkan › दुबार पीक पध्दतीसाठी सिंचन क्षमता वाढविण्यावर भर! 

दुबार पीक पध्दतीसाठी सिंचन क्षमता वाढविण्यावर भर! 

Published On: Aug 07 2018 10:54PM | Last Updated: Aug 07 2018 9:23PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

उत्पन्नवाढीच्या दृष्टीकोनातून शेतीमध्ये दुबार पीक सुविधा आवश्यक आहे. दुबार पीक पध्दतीसाठी  आवश्यक सिंचन व्यवस्था सक्षम होण्यासाठी ‘चांदा ते बांदा’ योजनेतून  जिल्ह्यातील 800 ठिकाणी वळण बंधारे, विजय बंधारे, कच्चे बंधारे, टायर बंधारे प्रस्तावित करावेत. अधीक्षक कृषि अधिकारी व कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग यांनी संयुक्तरित्या मोहीम म्हणून यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आढावा बैठकीत केली.

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात  मंगळवारी  ‘चांदा ते बांदा’ योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच.टी.जगताप, चांदा ते बांदा योजनेचे नियोजन अधिकारी गजानन धनावडे, प्रकल्प संचालिका श्रीमती घाणेकर, अशासकीय सदस्य प्रकाश परब, नितीन वाळके, अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, कार्यकारी अभियंता श्री. काळे आदी उपस्थित होते.

पशुसंवर्धन विभागाच्या ‘हॅपी एग्ज’ योजनेखाली कावेरी, गिरीराज, ग्रामप्रिया, वनराज या जातीच्या कोंबड्यांचा पुरवठा करावा, गीर गाईच्या दुग्धामध्ये फॅट प्रमाण जास्त असते, त्यामुळे या दुधाला दरही जादा मिळतो. यासाठी या गाईचा पुरवठा व्हावा, जिल्ह्यातील दुधाचे संकलन व जिल्ह्यातच पॅकिंग करून विक्री व्हावी यासाठी दुग्धव्यवसाय विभागाने योजना प्रस्तावित करावी. आंतरपिकाच्या अंतर्गत मिरी, जायफळ, तमालपत्री, हळद पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी कृषि विभागाने खास मोहीम हाती घ्यावी. मासळी सुकविण्यासाठी सोलर ड्रायर बसविण्यासाठी मत्स्य विभागाने त्वरीत प्रस्ताव पाठवावेत, मासे वाहतुकीसाठी इन्सुलेटेड व्हॅनबाबतचे प्रस्ताव तयार करावेत, आदी सूचना पालकमंत्री श्री. केसरकर यांनी या बैठकीत दिल्या.

निवती, आचरा बंदरातील गाळ काढणे, केज फिशिंगबाबत प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य लघू उद्योग विकास महामंडळमार्फत कार्यान्वित होत असलेले काथ्या प्रक्रिया उद्योग, पत्तन विभाग मार्फत सुरू असलेले जेट्टी बांधकामाचे प्रकल्प, बांबू लागवड याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.